दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे

By अजित मांडके | Published: May 10, 2024 03:28 PM2024-05-10T15:28:56+5:302024-05-10T15:29:12+5:30

ठाणे महापालिका हद्दीत मागील काही महिन्यांपासून अनाधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात आला होता.

Re establishment of unauthorized constructions in Diwa Unauthorized constructions also in Kalwa Mumbra Kharegaon areas | दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे

दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत मागील काही महिन्यांपासून अनाधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात आला होता. नवे आयुक्त सौरभ राव यांनी देखील आचारसंहितेच्या काळातही अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु असे असतांनाही आजही दिवा, मुंब्रा, कळवा, विटावा, खारेगाव या भागात अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिव्यात तर आजच्या घडीला ८८ बांधकामे नव्याने उभी राहत असल्याचा आरोप संजय घाडीगावकर यांनी केला आहे. याचे पुरावे देखील त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पालिकेला धाडले आहेत.  

तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. तसेच विधानसभेत देखील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या संदर्भात आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मागील काही महिने अनाधिकृत बांधकामांना अंकुश लावण्यात पालिकेला यश आले होते. परंतु आता पुन्हा आचारसंहितेच्या आड अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र खास करुन कळवा, मुंब्रा, दिवा भागात दिसत आहे.

दरम्यान आयुक्त सौरभ राव यांनी देखील मागील महिन्यात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु असे असतांनाही केवळ किरकोळ कारवाई केली जात असून आजही अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. याच अनाधिकृत बांधकामांसदर्भात उध्दव सेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी तक्रार केली होती. त्यानुसार उपायुक्तांनी संबधीत सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून या तक्रारीच्या अनुषंगाने शहनिशा करुन कारवाई करावी असे प्रस्तावित केले होते. परंतु तरी देखील अनाधिकृत बांधकामे सुरुच असल्याचे संबधीत सहाय्यक आयुक्तांकडून सांगतिले जात होते. अखेर घाडीगावकर यांनी या संदर्भातील थेट पुरावेच पालिकेला देऊ केले आहेत.

दिव्यातील अनाधिकृत बांधकामांचे फोटो, त्याचे लोकेशन देखील त्यांनी यात टाकले असून ते आपल्या एक्स अकाऊंटवरुन महापालिकेला धाडले आहे. त्यानंतर आता तरी पालिका या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यातही एकट्या दिव्यातच आजच्या घडीला ८८ च्या आसपास अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय कळवा, विटावा, खारेगाव, कळवा पूर्व आणि मुंब्य्रातही अशाच पध्दतीने अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Re establishment of unauthorized constructions in Diwa Unauthorized constructions also in Kalwa Mumbra Kharegaon areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे