Maharashtra Election 2019 ; उमरखेडच्याही भाजप आमदाराला ‘डच्चू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:12+5:30

जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांचे तिकीट कापली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Maharashtra Election 2019 ; 'Dachu' to BJP MLA from Umarkhed | Maharashtra Election 2019 ; उमरखेडच्याही भाजप आमदाराला ‘डच्चू’

Maharashtra Election 2019 ; उमरखेडच्याही भाजप आमदाराला ‘डच्चू’

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : नगराध्यक्ष नामदेव ससाने यांना उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भाजपने आर्णी पाठोपाठ उमरखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र नजरधने यांचे तिकीट कापले आहे. तेथील उमेदवारी आता उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने यांना देण्यात आली आहे.
उमरखेड मतदारसंघाच्या उमेदवारीचा वाद दूरपर्यंत पोहोचला होता. रिपाइंनेही या मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र रिपाइंचा अडसर दूर झाल्यानंतर भाजपचा उमेदवार कोण असा मुद्दा पुढे आला. बुधवारी रात्री जारी झालेल्या भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत आमदार राजेंद्र नजरधने यांचा पत्ता साफ करण्यात आला आहे. तेथे नगराध्यक्ष ससाने यांना रिंगणात उतरविले गेले. भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची या फेरबदलामध्ये महत्वाची भूमिका राहिल्याचेही भाजपच्या गोटातून सांगितले जाते. तिकीट कापल्याने आता नजरधने पक्षासोबत राहतात की वेगळा काही विचार करतात हे पाहणे महत्वाचे ठरते.
जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांचे तिकीट कापली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही आमदारांनी ५८ ते ६० हजार मतांची आघाडी पक्षाच्या उमेदवाराला मिळवून दिल्याने त्यांना जीवदान मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु प्रत्यक्षात या मतांच्या आघाडीचा आर्णीचे आमदार राजू तोडसाम व उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांना कोणताही लाभ झाला नसल्याचे दिसते. या मतांच्या आघाडीनंतरही पक्षाने त्यांना तिकीट नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. तोडसाम बंडखोरीच्या तयारीत आहेत. आता नजरधनेही तोच पावित्रा घेतात काय याकडे नजरा लागल्या आहेत.

दिग्रसमध्ये तारिक लोखंडवाला राष्ट्रवादीचे उमेदवार
शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उमेदवारी तारिक लोखंडवाला यांना दिली आहे. या जागेसाठी माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे पुत्र राजू पाटील यांचे नाव अखेरपर्यंत रेटले गेले. मात्र गुरुवारी जारी झालेल्या यादीत तारिक लोखंडवाला यांना स्थान देण्यात आले. राजू पाटील यांना राष्ट्रवादींच्या श्रेष्ठींनी पसंती दर्शविली नसल्याचे स्पष्ट होते.

पुसदमध्ये नाईक बंधूंमध्ये रंगणार सामना
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात नाईक विरुद्ध नाईक असा सख्ख्या चुलत भावांमध्ये सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेला पुसद मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचून घेतला आहे. तेथे विधान परिषद सदस्य अ‍ॅड. नीलय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक नीलय यांचा ही उमेदवारी आपल्या पुतण्याला मिळावी असा आग्रह होता. त्यांचा हा आग्रह पाहून भाजपने अखेरच्या क्षणी दोन चेहऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांचे सर्वेक्षणही तातडीने मागितले होते. मात्र पुन्हा वरच्या स्तरावर सूत्रे फिरली आणि भाजपच्या उमेदवारी माळ नीलय नाईकांच्या गळ्यात पडली. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीसोबतच नाईक कुटुंबीय आणि विशेषत: इंद्रनील यांच्या पक्षांतराच्या तमाम चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पुसदमध्ये आता नीलय नाईक विरुद्ध इंद्रनील नाईक असा सख्ख्या चुलत भावांमध्ये राजकीय सामना दिसणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 'Dachu' to BJP MLA from Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.