फक्त १४ नगरसेवकांची गरज, काही होऊ शकते; वसईत महापौरपदासाठी भाजपा मैदानात, बविआला शह देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 12:35 IST2026-01-31T12:34:46+5:302026-01-31T12:35:58+5:30
Vasai Virar Mayor Election 2026: वसई-विरार मनपातील महापौर निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

फक्त १४ नगरसेवकांची गरज, काही होऊ शकते; वसईत महापौरपदासाठी भाजपा मैदानात, बविआला शह देणार?
Vasai Virar Mayor Election 2026: एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा पराभव झाला होता. मात्र, यातून सावरत बहुजन विकास आघाडीने वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार प्रचार व कार्यकर्त्यांच्या जोरावर या निवडणुकीत मुसंडी मारत पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. ११५ जागांसाठीच्या वसई-विरार मनपा निवडणुकीत बविआचे ७१ उमेदवार निवडून आले. भाजपाला ४३, काँग्रेसला १ आणि शिंदेसेनेला १ जागेवर विजय मिळाला. यानंतर आता महापौर निवडीवरून बहुजन विकास आघाडी आणि भाजपा यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
वसई-विरारमध्ये ७१ जागा जिंकून बहुजन विकास आघाडीने एकहाती वर्चस्व राखले. तर भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र, महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी बविआसह भाजपानेही उमेदवारी अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी बविआतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निषाद चोरघे तर भाजपतर्फे अॅड. दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज सादर केले आहेत. उपमहापौरपदासाठी बविआकडून कन्हय्या भोईर व मार्शल लोपीस तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज भरले.
बविआला स्पष्ट बहुमत असताना भाजपाकडून 'लोटस ऑपरेशन'
बविआला स्पष्ट बहुमत असताना भाजपाकडून 'लोटस ऑपरेशन'ची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वसई-विरारमध्ये महायुतीचे ४४ नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर आणि उपमहापौर बिनविरोध होऊ नये यासाठी भाजप आक्रमक भूमिकेत आहे. आमची रणनीती काय आहे, हे आम्ही ३ फेब्रुवारीला दाखवू. आमच्याकडे ४४ नगरसेवक आहेत, आम्हाला फक्त १४ नगरसेवकांची गरज आहे. काहीही होऊ शकते असे वक्तव्य करत भाजपा आमदार राजन नाईक यांनी 'लोटस ऑपरेशन'चे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वसई-विरार मनपातील महापौर निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्या निकटवर्तीयाचा शेवटच्या क्षणी अर्ज
बविआचे संख्याबळ पाहता आणि त्यातही अनुभव लक्षात घेता अजीव पाटील यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित मानण्यात येत आहे. पक्षाचे संघटक सचिव असलेले अजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू असून पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मनपात यापूर्वी ते माजी स्थायी समिती सभापती होते. महापौरपदासाठी अर्ज करणारे प्रफुल्ल साने हेसुद्धा ज्येष्ठ नगरसेवक असून ते माजी पाणीपुरवठा सभापती आहेत. तर बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या अगदी जवळचे निषाद चोरघे यांनीही शेवटच्या क्षणी अर्ज भरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, बविआतर्फे उपमहापौरपदासाठी सर्वाधिक मतांनी निवडून आलेले मार्शल लोपीस आणि नायगावमधील ज्येष्ठ नेते कन्हय्या भोईर यांनी अर्ज भरले. यंदा बविआकडून १० ख्रिस्ती नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून मार्शल लोपीस यांची उपमहापौरपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ३ फेब्रुवारीला पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापौर व उपमहापौरांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.