घासून नाही तर ठासून डॉ. हेमंत सावरांना निवडून आणणार; आमदार नितेश राणे यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 20:34 IST2024-05-11T20:32:06+5:302024-05-11T20:34:21+5:30
"हिंदूंचे सण साजरे करायचे असतील, हिंदू मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपाला मत द्या"

घासून नाही तर ठासून डॉ. हेमंत सावरांना निवडून आणणार; आमदार नितेश राणे यांचे विधान
मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: पालघर लोकसभा मतदार संघातून घासून नाही तर ठासून महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना निवडून आणणार असल्याचे वक्तव्य निरीक्षक म्हणून नेमणूक झालेले आमदार नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच आदित्य ठाकरेंनी त्यांच्या कपाळावर ‘मेरा बाप **** है’ हा शिक्का असून तो आधी त्यांनी पुसावा मग इतरांवर टिका करावी, असे वादग्रस्त व खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. हिंदूंचे सण साजरे करायचे असतील, हिंदू मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपाला मत द्या, असेही त्यांनी सांगितले.
भाजप आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी त्यांनी नालासोपारा पूर्वेकडील रेजन्सी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जहरी टिका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पेंग्विन ठाकरे असा केला. श्रध्दा वालकर हत्याकांड, साधूंची हत्या आदींची पुनरावृत्ती नको असेल तर मोंदीना सत्तेवर आणा. जर कॉंग्रेसला सत्तेवर आणले तर हिंदूंचे सण देखील साजरे करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच भाजप वसई विरार जिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख मनोज बारोट, भाजपाचे नालासोपारा विधानसभा संघटन राजन नाईक आणि वसई विधानसभा संघटक मनोज पाटील उपस्थित होते.