वणा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा, पाच ट्रॅक्टरसह दोन जेसीबी केलेय जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:53 IST2024-11-27T16:50:06+5:302024-11-27T16:53:34+5:30

समुद्रपूर तालुक्यातील प्रकार : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ८५ लाखांचा मुद्देमाल

Illegal sand extraction in Wana river, five tractors and two JCBs seized | वणा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा, पाच ट्रॅक्टरसह दोन जेसीबी केलेय जप्त

Illegal sand extraction in Wana riverbed, five tractors and two JCBs seized

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
समुद्रपूर तालुक्यातील वणा नदीच्या पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांच्या पथकाने धाड टाकून पाच ट्रॅक्टरसह दोन जेसीबी, असा एकूण ८५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे या तालुक्यातील वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.


स्थानिक गुन्हे शाखेची चमू हिंगणघाट उपविभागात गस्तीवर असताना त्यांना समुद्रपूर परिसरातील वणा नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे नदीपात्रात पाहणी केली असता, दोन जेसीबींच्या साहाय्याने अवैध उत्खनन करून पाच ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू वाहतूक होत असल्याने निदर्शनास आले. पाच ट्रॅक्टर चालकांना वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांच्याकडील वाहने जप्त करण्यात आली. पाच ट्रॅक्टर, दोन जेसीबी व ५०० ब्रास वाळू, असा एकूण ८५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 


ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलिस अंमलदार हमीद शेख, नरेंद्र पाराशर, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, राजेश तिवसकर, रवी पुरोहित, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, नितीन इटकरे, सागर भोसले व उदय सोळुंके आदींनी केली.


तालुका प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी
समुद्रपूर तालुक्यातील वणा नदीच्या पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळू उपसा सुरु आहे. याकडे स्थानिक महसूल विभाग व पोलिस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वाळू चोरट्यांची चांगलीच हिंमत वाढली. • निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असताना या वाळू चोरट्यांनी याचाच फायदा घेते वारेमाप वाळूचा उपसा केला. आताही तोच प्रकार सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याने कारवाईकडे कानाडोळा केला जात होता, असे मंगळवारी झालेल्या कारवाईवरुन दिसून आले.


या वाळ चोरट्यांविरुद्ध समुद्रपुरात गुन्हा दाखल
पोलिसांनी जेसीबी चालक गजानन छगन तामसवाडे (३०, रा. ब्राह्मणी), श्रावण रामचंद सिडाम (३२, रा. हरणखुरी) तसेच ट्रॅक्टर चालक यशवंत परसराम दाते (४३, रा. कांडळी), अरविंद अशोक कोटनाके (३०, रा. रामनगर), अमोल गोविंद डोमकावळे (२८, रा. कांडळी), आकाश भाऊराव कन्नाके (२९, रा. हरणखुरी) यांना ताब्यात घेण्यात आले. तर जेसीबी व ट्रॅक्टर मालक प्रशांत देवराव चौधरी (३०, रा. निरगुडी) महादेव वांदिले (रा. कांडळी) व युवराज कारमोरे (रा. कांडळी) हे तिघेही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Illegal sand extraction in Wana river, five tractors and two JCBs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.