Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहिणींनी संपवलं जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:45 IST2025-12-25T18:44:21+5:302025-12-25T18:45:36+5:30
Uttar Pradesh Shocking News: आपल्या पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलले.

AI Image
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. आपल्या पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
राधा सिंह आणि जिया सिंह, अशी आत्महत्या केलेल्या दोन सख्या बहिणींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांच्या आईने, गुलाब देवी यांनी त्यांना नेहमीप्रमाणे किराणा सामान आणण्यासाठी दुकानात पाठवले. मात्र, दुकानातून परतल्यानंतर दोन्ही मुलींनी आपण फिनाईल प्यायल्याचे आईला सांगितले. हे ऐकताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. दोन्ही मुलींना तातडीने राणी लक्ष्मीबाई रुग्णालयात आणि त्यानंतर ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने राधाला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर जियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राधा आणि जिया या दोघांनाही त्यांचा पाळीव कुत्रा जीवापाड प्रिय होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा कुत्रा आजारी होता. अनेक नामांकित डॉक्टरांकडे उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. आपल्या लाडक्या कुत्र्याला वेदनेत पाहून दोन्ही बहिणी प्रचंड नैराश्यात गेल्या. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा कुटुंबियांनी केला.
लखनौ पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पाळीव प्राण्याच्या आजारपणामुळे खरंच इतका मोठा निर्णय घेतला गेला की यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या दोन्ही बहिणी २०१४ पासून मानसिक समस्यांशी झुंजत होत्या आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते, अशीही माहिती समोर आली आहे.