Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 19:36 IST2025-10-21T19:34:51+5:302025-10-21T19:36:37+5:30
Meerut Crime: मेरठ येथील 'नया सवेरा' व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
मेरठच्या गंगानगर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या 'नया सवेरा' व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मृताच्या कुटुंबीयांनी केंद्राचे संचालक आणि इतरांवर हत्येचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
भवानपूरच्या जय बाना गावातील रहिवासी असलेला ४२ वर्षीय फयमीद याला १५ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी या केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, २० ऑक्टोबर २०२५ रोजी फयमीदच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली. कुटुंब केंद्रात पोहोचले असता फयमीदच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या, ज्यामुळे त्यांना हत्येचा संशय आला.
सीसीटीव्ही फुटेज पाहून कुटुंब चकीत
फयमीदच्या कुटुंबाने केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये फयमीदवर अत्याचार होत असल्याचे आणि त्याचे तोंड, हात आणि पाय बांधलेले असल्याचे दिसले. या फुटेजच्या आधारावर मृताच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. मृताच्या भावाने आपल्या तक्रारीत थेट आरोप केला आहे की, व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून फयमीदची हत्या केली.
मेरठचे एसएसपी काय म्हणाले?
मेरठचे एसएसपी विपिन ताडा म्हणाले की, "कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन नामांकित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल."