School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:48 IST2026-04-08T13:47:35+5:302026-04-08T13:48:51+5:30
Uttar Pradesh meerut School Bus Accident: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात आज सकाळी एका शालेय बसला भीषण अपघात घडला.

School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
उत्तर प्रदेशातीलमेरठ जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. दौराला-लवाड रस्त्यावर ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. सुदैवाने, बस एका झाडाला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खेरी येथील एका शाळेची बस सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे जात होती. दौराला-लवाड मार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याखालील खड्ड्यात जाऊन उलटली. बस खड्ड्यात उलटल्यानंतर एका झाडाला धडकली. त्यामुळे बसचा वेग मंदावला. हे झाड नसते तर, बस अधिक खोलवर जाऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
अपघात घडताच रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ बसच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी बसच्या काचा फोडून आणि दरवाजातून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी समजताच पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. सुदैवाने, बहुतांश विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या असून, ज्यांना दुखापत झाली नव्हती त्यांना प्राथमिक तपासणीनंतर पालकांसोबत घरी पाठवण्यात आले आहे.
पोलीस तपास सुरू
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. बसचा वेग जास्त होता की तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.