मजबूत सरकार चालविणारा पंतप्रधान निवडण्याची संधी; नरेंद्र मोदी यांचे आवाहन; सपा, काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:35 AM2024-05-17T10:35:39+5:302024-05-17T10:37:12+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात मतदान असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे.

chance to elect a prime minister who will run a strong government said narendra modi | मजबूत सरकार चालविणारा पंतप्रधान निवडण्याची संधी; नरेंद्र मोदी यांचे आवाहन; सपा, काँग्रेसवर हल्लाबोल

मजबूत सरकार चालविणारा पंतप्रधान निवडण्याची संधी; नरेंद्र मोदी यांचे आवाहन; सपा, काँग्रेसवर हल्लाबोल

जौनपूर / भदोही (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात मतदान असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यातील विविध शहरात मॅरेथॉन पद्धतीने एकापाठोपाठ एक सभांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशाच्या सामर्थ्याची जाणीव संपूर्ण जगाला करून देणारा पंतप्रधान निवडण्यासाठी ही निवडणूक असल्याचे म्हटले. 

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, "ही लोकसभा निवडणूक म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडण्याची संधी आहे. असा पंतप्रधान जो एक मजबूत सरकार चालवतो, ज्याच्यावर जगाचे वर्चस्व असू शकत नाही, परंतु, जगाला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा तो असावा, म्हणून जेव्हा तुम्ही आमच्या कृपाशंकरजी यांना जौनपूरमधून, बी. पी. सरोजजी यांना मच्छलीशहरमध्ये मतदान करता, तेव्हा तुमच्या मताने एक मजबूत सरकार बनते. त्यांना दिलेली मते थेट मोदींच्या खात्यात जमा होतात. 

पंतप्रधान मोदी यांनी भदोही येथे सभेत समाजवादी पार्टी व काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हटले की, बंगालमध्ये तृणमूलचे दलित व महिलांवर अत्याचाराचे राजकारण सपा व काँग्रेसला आता उत्तर प्रदेशात आजमावयाचे आहे, म्हणून त्यांनी भदोही येथून तृणमूलच्या तिकिटावर उमेदवार देऊ केला आहे. 

सपा आणि काँग्रेसला त्यांची अनामत रक्कमही वाचवणे अवघड आहे, म्हणूनच ते भदोहीमध्ये राजकीय प्रयोग करत आहेत. हिंदूंची हत्या, दलित - आदिवासींवर अत्याचार आणि महिलांवरील अत्याचार हेच बंगालमध्ये तृणमूलचे राजकारण आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आपापसांत वाटून घेतले पंतप्रधानपद

मधुबनी : इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास त्यातील घटक पक्षांनी पंतप्रधानपद आपापसांत वाटून घेण्याचे ठरविले असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. बिहारमधील मधुबनी मतदारसंघात गुरुवारी प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, देशाला कणखर पंतप्रधानांची आवश्यकता आहे. दरवर्षी नवी व्यक्ती पंतप्रधानपदावर विराजमान होणे देशाला परवडण्यासारखे नाही.

शाह म्हणाले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण असेल हे कोणीतरी सांगू शकेल काय? यंदाच्या लोकसभा निवडणुकांत इंडिया आघाडी सत्तेवर येण्याची अजिबात शक्यता नाही. मात्र, तरीही या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा शोधायचा म्हटले तर ममता बॅनर्जी की एम. के. स्टॅलिन की लालूप्रसाद यादव की आणखी कोण? असे प्रश्न मनात येतात. 

 

Web Title: chance to elect a prime minister who will run a strong government said narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.