उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
By अजित मांडके | Updated: May 4, 2024 14:14 IST2024-05-04T14:13:56+5:302024-05-04T14:14:34+5:30
आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.

उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
ठाणे : कल्याण लोकसभेत उद्धव सेनेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. उद्धव सेनेचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आठवडाभरात उद्धव सेनेला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला आहे.
यापूर्वी उद्धव सेनेचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे उद्धव सेनेत सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.