मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये आमदार मेहतांमुळेच महायुती तुटली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:47 IST2026-01-01T08:47:45+5:302026-01-01T08:47:45+5:30
मनमानी वृत्तीमुळे जनता पुन्हा धडा शिकवेल

मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये आमदार मेहतांमुळेच महायुती तुटली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, मिरा रोड : मिरा-भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या घमेंडी वृत्तीमुळे भाजप-शिंदेसेना महायुती झाली नाही. मेहतांच्या मनमानी वृत्तीमुळे २०१९ला मिरा-भाईंदरच्या जनतेने त्यांना धडा शिकवला होता. तसाच धडा महापालिका निवडणुकीत जनता पुन्हा शिकवेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेतील मेहतांची मनमानी फक्त शिंदेसेना आणि प्रताप सरनाईकच रोखू शकतो, असे ते म्हणाले.
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. भाजपने ८७ जागांवर; तर शिंदेसेनेने ८१ जागांवर उमेदवार दिले असून, राष्ट्रवादीच्या ३४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महायुती तुटल्यानंतर भाजप व शिंदेसेनेत खरी लढत होणार आहे.
सर्व समाजाला दिले स्थान
आमदार मेहता म्हणतात, सर्व समाजाला महापालिकेत संधी देणार भाजपने मराठी भाषिक २४, आगरी समाजास १५, गुजराती १२, राजस्थानी - जैन १४, उत्तर भारतीय १४, पंजाबी १, बंगाली १, दक्षिण भारतीय २, ख्रिश्चन समाजाच्या ४ जणांना उमेदवारी दिली आहे. सर्व समाजाला स्थान दिले असल्याचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.
गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा उत्तर भारतीयांना दिल्या आहेत. सर्व्हेनुसार ज्यांच्यासोबत जनाधार होता, त्यांना पक्षाने न्याय देत उमेदवारी दिली. काही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी देता आली नाही. बऱ्याच जणांनी माघार घेतली आहे व ज्यांनी नाही घेतले त्यांना समजावून ते पण मागे घेतील. एक जागा आरपीआयच्या उमेदवार निर्मला सावळे आमच्या चिन्हावर लढवणार आहे.
पराभवाच्या भीतीने मुलाला संधी नाही
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांना हरवणार, असा इशारा मेहतांनी दिल्यानंतर सरनाईक म्हणाले की, मेहता यांनी पराभवाच्या भीतीने स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी सांगितले की, पक्षाच्या ३४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात लढायची ताकद दाखवली आहे.
शिंदेसेनेची अवहेलना, अपमान सहन करणार नाही
मैत्रीपूर्ण लढायचे होते, तर महायुतीमध्ये हातात हात घालून लढायचे होते. आम्ही हक्काचे मागत होतो, ठाणे पॅटर्नप्रमाणे. मात्र, शिंदेसेनेची अवहेलना आणि अपमान सहन करणार नाही.
शिंदेसेनेने ८१ भारतीय नागरिक उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. मेहतांनी उमेदवार सांगताना जाती-पातीचा उल्लेख करून समाजात दुफळी माजवण्याचे काम केले आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व जाती-समाजाला एकत्र जोडण्याचे काम करत असताना, मेहता मात्र तोडण्याचे काम करत असून, त्यांच्या अशा राजकारणाचा निषेध करतो.
एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
मीरा-भाईंदर हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अनेक जण पुन्हा पक्षात परतू लागले आहेत, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी सांगितले.