आठ ईव्हीएम ठाण्यात भंगार सामानात सापडल्याने खळबळ; आव्हाडांनी उपस्थित केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 06:44 IST2024-04-27T06:44:23+5:302024-04-27T06:44:52+5:30
दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बंद खोलीत ३५० ट्रंकांमध्ये निवडणूक साहित्य

आठ ईव्हीएम ठाण्यात भंगार सामानात सापडल्याने खळबळ; आव्हाडांनी उपस्थित केली शंका
ठाणे : ईव्हीएम की बॅलेट पेपर यावरून देशभर दावे-प्रतिदावे सुरू असताना व याबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्याचवेळी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगार सामानात आठ ईव्हीएम सापडल्या.
स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी (स्टँड) खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. त्यातील एका खोलीचा दरवाजा तुटल्याने तो दुरुस्त करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे कर्मचारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तेथे गेले असता एका ट्रंकमधून ही आठ ईव्हीएम हस्तगत करण्यात आली. मात्र, खोलीत तब्बल ३५० ट्रंक असून मनुष्यबळाअभावी त्याची तपासणी झालेली नाही. कदाचित या अन्य ट्रंकांमध्ये ईव्हीएम असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे यावेळी उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
स्टेडियममधील जिन्याखालील खोलीत ईव्हीएम आढळली आहेत. ठाणे जिल्ह्यात १०० ईव्हीएम आले, तर १०० ईव्हीएम मॅच करून जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम राहिले कसे, ही कुठली ईव्हीएम आहेत. २०१४ पासून ठेवलेल्या या ईव्हीएमकडे कोणाचे लक्ष कसे गेले नाही? यामुळे ईव्हीएम बदलले जातात या शंकेला पुष्टी मिळते.
- जितेंद्र आव्हाड, आमदार, शरद पवार गट
ठाणे महापालिकेच्या कोंडदेव स्टेडियममधील खोलीची राजकीय पक्षांना पूर्वसूचना देऊन राजकीय प्रतिनिधींच्या समक्ष खोलीची तपासणी केली. जुन्या ग्रामपंचायत, जि. प. निवडणुकीचे साहित्य, लिफाफे तसेच एका ट्रंकमध्ये ईव्हीएम आढळली. याबाबत सविस्तर अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केला आहे. दरवाजाची दुरुस्ती करून दरवाजा सीलबंद केला. पोलिस बंदोबस्त पूर्ववत केला. वापरात नसलेल्या गोदामाचा व लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. या प्रक्रियेचे चित्रीकरण केले आहे. - अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी, ठाणे