कल्याणमध्ये पाटील विरुद्ध शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:04 AM2019-03-15T01:04:10+5:302019-03-15T01:04:37+5:30

राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक आव्हाने : मनसेचीही भूमिका ठरणार महत्त्वाची

In Kalyan Patil Patil Shinde | कल्याणमध्ये पाटील विरुद्ध शिंदे

कल्याणमध्ये पाटील विरुद्ध शिंदे

Next

- प्रशांत माने 

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून ठाणे महापालिकेचे नगरसेवक व ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या नावाची घोषणा गुरुवारी केली. त्यामुळे या मतदारसंघात १६ वर्षांनंतर पाटील यांच्या रूपाने स्थानिक उमेदवाराला प्राधान्य मिळाले असून, शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने या मतदारसंघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, इच्छुक सात जणांमधून उमेदवारी मिळवलेल्या बाबाजी पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षाच्या उमेदवारासह स्वत:च्या पक्षांतर्गत कलह आणि गटबाजीचे आव्हान असणार आहे.

शिवसेनेकडून पुन्हा डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार आनंद परांजपे यांनी कल्याणमधून निवडणूक लढवण्यास नापसंती दर्शवली. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे कल्याण लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. तुल्यबळ उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी मनसेला सहकार्य करून त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद उभी करेल, अशीही चर्चा सुरू होती. अखेर, राष्ट्रवादीने पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून ते कोणता निर्णय घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाटील हे प्रारंभी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार नव्हते. कल्याण ग्रामीणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार होता. परंतु, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘तुम्ही लोकसभा लढा, आम्ही तुमचा विचार विधानसभेसाठीही करू’, अशी ग्वाही दिल्याने त्यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे. मात्र, पाटील यांना अशा प्रकारचे आश्वासन मिळाल्याने विधानसभेसाठी लोकसभा लढवण्यास इच्छुक नसलेल्यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. या इच्छुकांमध्ये पाटील यांनी बाजी मारल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील विरूद्ध शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

आगरी समाजात समाधानाचे वातावरण
कल्याणमधील पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांशी शरद पवार यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी आगरी समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती.
त्यावर समाजमान्य नेतृत्व असेल आणि निवडणूक लढवण्याची इच्छा असेल, तर त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन पवारांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता पाटील यांना मिळालेल्या उमेदवारीने झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
आगरी समाजाचा उमेदवार पाटील यांच्या रूपाने मिळाला असला तरी कल्याण ग्रामीण, डोंबिवली ग्रामीण तसेच पश्चिमेकडील भाग, कल्याण पूर्व आणि अंबरनाथ वगळता या समाजाचा अन्यत्र प्रभाव दिसून येत नाही. आगरी समाजासह मतदारसंघात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम आणि अन्य भाषिकांची एकगठ्ठा मते पाहता याठिकाणी जातीय समीकरणांनाही तितकेच महत्त्व आहे.

१६ वर्षांनंतर स्थानिक उमेदवारास प्राधान्य
शिवसेना असो अथवा राष्ट्रवादी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १६ वर्षे लोकसभा क्षेत्राबाहेरील व्यक्तीलाच उमेदवार म्हणून प्राधान्य दिले आहे. दिवंगत प्रकाश परांजपे यांच्यासह आनंद परांजपे, वसंत डावखरे, डॉ. श्रीकांत शिंदे या बाहेरील व्यक्तींनी आजवर येथून निवडणूक लढवली आहे. परंतु, हॉटेल व्यावसायिक व नगरसेवक असलेल्या बाबाजी पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीने कल्याण लोकसभा क्षेत्रात वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन स्थानिकाला प्राधान्य दिले आहे.

Web Title: In Kalyan Patil Patil Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.