फडणवीस त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करतील; कपिल पाटील यांचा भाजप आमदारावरच निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:45 PM2024-05-27T13:45:03+5:302024-05-27T13:46:19+5:30

निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा लावला आरोप

Devendra Fadnavis will teach him lesson says Kapil Patil targeting own BJP MLA | फडणवीस त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करतील; कपिल पाटील यांचा भाजप आमदारावरच निशाणा

फडणवीस त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करतील; कपिल पाटील यांचा भाजप आमदारावरच निशाणा

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर (जि. ठाणे): भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व भाजप आ. किसन कथोरे यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. कथोरे यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप पाटील यांनी त्यांचे नाव न घेता शनिवारी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी दोन वेळा सत्तांतराच्या वेळेस करेक्ट कार्यक्रम केला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात ज्या आमदाराने काम केले आहे, त्या आमदाराचाही करेक्ट कार्यक्रम ते करतील, असे खा. पाटील यांनी म्हटले आहे.

आधीपासूनच राजकीय धुसफुस

लोकसभा निवडणुकीला वर्ष बाकी असल्यापासून पाटील व  कथोरे यांच्यात धुसफुस सुरू होती. मुरबाड पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांच्यात राजकीय वाद उफाळून आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाटील यांनी कथोरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यातील वाद जगजाहीर झाला होता.  

सभा, बैठका घेतल्या तरीही...

मुरबाड मतदारसंघात काम न केल्याचा आरोप आपल्यावर होईल याचा अंदाज कथोरे यांना आधीपासूनच आला होता. त्यामुळे आ. कथोरे यांनी पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित केली आणि त्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. शिवाय, मुरबाड आणि बदलापूर या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. मात्र, तरीही पाटील यांनी कथोरे यांच्यावर आता अप्रत्यक्षपणे अविश्वास दर्शवला आहे.  

...तर मी देखील उत्तर देईन: त्यांनी माझे नाव घेतलेले नाही. ते जेव्हा नाव घेऊन माझ्यावर आरोप करतील तेव्हा मी देखील उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया आ. किसन कथोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Devendra Fadnavis will teach him lesson says Kapil Patil targeting own BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.