भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
By नितीन पंडित | Updated: April 20, 2024 16:17 IST2024-04-20T16:17:38+5:302024-04-20T16:17:51+5:30
भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र असून या महिलांनी कार्यालया बाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली.

भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
भिवंडी: लोकसभा निवडणुकीचे राजकारण तापलेला असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.ही बातमी भिवंडी शहरात समाज माध्यमातून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरल्या नंतर शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालय असलेल्या कोणार्क अर्केड या इमारती खाली शेकडो महिला एकत्रित झाल्या. विशेष म्हणजे रईस कासम शेख यांचे कार्यालय सुद्धा बंद करण्यात आले आहे.
भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र असून या महिलांनी कार्यालया बाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊ देणार नाहीत आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. दरम्यान रईस शेख यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.परंतु शहरातील समाजवादी पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम व महाराष्ट्रातील मुस्लिम असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आला आहे.समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आजमी व रईस शेख यांच्यात भिवंडी शहरात मागील दोन वर्षांपासून पक्षांतर्गत वर्चस्वा वरून वाद असून त्यातूनच हा निर्णय रईस शेख यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.