ठळक मुद्देएवढेच नव्हे तर काही मालिकांचे एक तासांचे विशेष भाग देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मालिकांचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. पण असे असेल तरी झी मराठीवरील मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत. एवढेच नव्हे तर काही मालिकांचे एक तासांचे विशेष भाग देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

पौराणिक कथा आणि चातुर्मासातले व्रतवैकल्य यावर आधारित 'घेतला वसा टाकू नको' या मालिकेचा कहाणी गुढीपाडव्याचीचा हा एका तासाचा भाग 18 एप्रिलला दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येणार आहे. तसेच सोमवार पासून याच मालिकेतून 'रामनवमी' विशेष भाग प्रक्षेपित होतील. या विशेष भागांमध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्माआधीपासून ते श्रीराम जन्मापर्यंतची रंजक कहाणी दाखवण्यात येणार आहे.

माझा होशील ना ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येणार आहे. मनालीवरून परत आल्यावर ब्रह्मे घरावर आणि सई आदित्य समोर अनेक नवीन आव्हाने असणार आहेत. गुलप्रीत हीच बंधू मामाची बायको आहे हे घरातल्या सगळ्यांना कळणार आहे, तसेच दादामामाची बायको सिंधूने घराचा ताबा घेतला आहे. तिकडे जे डी चा आदित्य ग्रुप ऑफ कंपनीवर डोळा आहे. या सर्व आव्हानांना हे कुटुंब कसं सामोरं जाईल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

मनू आणि अनिकेतच्या लग्नाचं सत्य विक्षिप्त समर आणि मनूच्या घरच्यांसमोर येणार असून पुढे काय घडणार हे प्रेक्षकांना ‘पाहिले ना मी तुला’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मध्ये मोमो सोबत ओमचा साखरपुडा संप्पन होईल की शकू मावशी रॉकीच्या मदतीने स्वीटू आणि ओमला एकत्र आणणार हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये सोहमचं खरं रूप आसावरी समोर येईल का? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहे.

तर देवमाणूसमध्ये दिव्या डॉ. अजितचं खरं रूप जगासमोर आणेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. तर रात्रीस खेळ चाले 3 मध्ये अभिराम वाडा विकायला तयार होईल? सरिता वाडा विकण्याचा विचार करत असताना दत्ता विरोधात का जाईल? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: zee marathi will telecast new episodes in lock down in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.