subodh bhave perform with Manasi naik in star pravah's din din diwali | सुबोध भावेला कुणी नाचवलं आपल्या तालावर?
सुबोध भावेला कुणी नाचवलं आपल्या तालावर?

नाटक असो, मालिका असो वा सिनेमा... तिन्ही माध्यमांवर वर्चस्व गाजवणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोध सध्या तुला पाहते रे या मालिकेत झळकत आहे तर त्याचा आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा चित्रपट लवकरच येत आहे. या सगळ्यामुळे सध्या सुबोध भावे प्रचंड फॉर्ममध्ये आहे. सध्या सगळीकडेच सुबोधचाच दबदबा पाहायला मिळतोय असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याला एका व्यक्तीने मात्र आपल्या तालावर नाचवलं आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आहे अभिनेत्री मानसी नाईक.स्टार प्रवाह’वरील ‘दिन दिन दिवाळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुबोध-मानसीने पहिल्यांदाच गाण्यांवर एकत्र ठेका धरला. मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ समजला जाणाऱ्या सदाबहार गाण्यांवर या दोघांनी परफॉर्मन्स सादर केला.

मानसी जरी उत्तम नृत्यांगना असली तरी तिच्यामते सुबोधचा उत्साह थक्क करणारा होता. सुबोध सोबत परफॉर्म करायला खूपच मजा आली असे मानसीचे मत आहे. मानसी तिच्या या अनुभवाविषयी सांगते, ‘मी आणि सुबोध खूप चांगले मित्र असल्यामुळे डान्समध्येही तीच केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुबोधसोबत मी याआधी कधीच परफॉर्म केले नव्हते. त्यामुळे थोडी भीती होती. पण रिहर्सलदरम्यान सुबोधने माझी भीती पळवली आणि आम्ही धमाकेदार नृत्य सादर करु शकलो. या परफॉर्मन्सनंतर सुबोधच माझ्यापेक्षा उत्तम डान्सर आहे हे मी ठोसपणे सांगू शकते. सुबोध आणि माझा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काहीच शंका नाही.’

सुबोध आणि मानसीच्या या धमाकेदार नृत्यासोबतच सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, मृण्मयी देशपांडे, मानसी नाईक, पर्ण पेठे, मयुरेश पेम आणि स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवती आणि ‘ललित २०५’ मधील नील यांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

स्टार प्रवाहचा दिवाळी विशेष कार्यक्रम ‘दिन दिन दिवाळी’ रविवार ४ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.


Web Title: subodh bhave perform with Manasi naik in star pravah's din din diwali
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.