Navratri special episode in Chala Hawa Yeu Dya | 'चला हवा येऊ द्या'मध्ये नवरात्रीची धूम
'चला हवा येऊ द्या'मध्ये नवरात्रीची धूम

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. नुकतंच या कार्यक्रमाचं शेलिब्रेटी पॅटर्न हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं. यात विविध सेलिब्रेटी हजेरी लावताना पहायला मिळत आहेत. या शेलिब्रेटी पॅटर्नला देखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.

येत्या आठवड्यात थुकरट वाडीतील विनोदवीर नवरात्री साजरी करणार आहेत आणि त्यासाठी या मंचावर प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे, गायत्री दातार, स्नेहलता वसईकर, ऋतुजा बागवे, हेमांगी कवी, सायली संजीव, भार्गवी चिरमुले, किशोरी आंबिये आणि गायिका सावनी रवींद्र सज्ज होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवातच या अभिनेत्री एक धमाकेदार गरबा-दांडिया करून करणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’च्या या नवरात्री विशेष भागात विनोदवीर ‘हम पाच’ या कार्यक्रमावर आधारित स्पूफ 'हम पांचट' सादर करणार आहेत ज्यामध्ये कुशल बद्रिके अशोक सराफ तर भाऊ कदम त्यांच्या बायकोची भूमिका साकारतील. त्यामुळे प्रेक्षक हसून हसून लोट-पोट होणार यात काहीच शंका नाही. इतकंच नव्हे तर अभिनेत्री किशोरी आंबिये सर्व प्रेक्षकांसोबत नवरात्रीतील मजेदार किस्से शेअर करतील. नवरात्रीत काही जण ऑफबीट गरबा कसे नाचतात, काही कपल कसे मजेशीर दांडिया खेळतात याचं प्रात्यक्षिक किशोरी ताई मंचावर देताना दिसतील. तसंच शेलिब्रिटी पॅटर्न मध्ये या आठवड्यात गार्गी फुले व प्रल्हाद कुरतडकर आणि अद्वैत दादरकर व मिताली साळगावकर यांचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Web Title: Navratri special episode in Chala Hawa Yeu Dya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.