Fate to get loyal receipts - Kishori Shahane | निष्ठावान रसिक मिळायला भाग्य लागतं – किशोरी शहाणे
निष्ठावान रसिक मिळायला भाग्य लागतं – किशोरी शहाणे
छोट्या पडद्यावर सध्या 'जाडू बाई जोरात' ही मालिका रसिकांना चांगलीच भावते आहे. यातील अभिनेत्री किशोरी शहाणे आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यातील जुगलबंदी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी किशोरी शहाणे यांचा जुना विनोदी अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या निमित्ताने किशोरी शहाणे यांच्याशी साधलेला हा संवाद.
 
'जाडू बाई जोरात' ही मालिका हिट ठरत आहे. सर्व स्तरातील रसिकांना ती भावते आहे.तर ही मालिका करावी असं का वाटलं याविषयी जाणून घ्यायला आवडेल?
 

'जाडू बाई जोरात' या मालिकेच्या निमित्ताने जवळपास दहा ते बारा वर्षांनंतर मी विनोदी भूमिका साकारत आहे. मला विनोदी भूमिका साकारायला आवडतात.त्यामुळे आवडीचं करायला मिळत असल्याने मी एक्साईटेड होते. मुळात जेव्हा या मालिकेची ऑफर मिळाली आणि स्क्रीप्ट वाचली तेव्हाच ती भावली.यातील माझी व्यक्तीरेखा गंमतीशीर, मजेशीर आणि वेगळी आहे.सर्वसामान्यांना आपल्या घरात पाहायला आवडेल अशी हलकीफुलकी कथा या मालिकेची आहे. या मालिकेत निर्मिती सावंत माझी बालमैत्रिण दाखवली आहे.निर्मितीला तिच्या लेकीचं लग्न माझ्या मुलाशी करण्याची इच्छा आहे. त्यातूनच सगळी तू-तू-मैं-मैं अशा मजेशीर गोष्टी रसिकांना जाडू बाई जोरात या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
 
या मालिकेनं सर्वच वयोगटातील रसिकांची मनं जिंकली आहेत. तर या मालिकेनंतर तुम्हाला तुमच्या भूमिकेसाठी मिळालेली एखादी वेगळी प्रतिक्रिया मिळाली आहे का ?
 

ही मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.सर्वच वयोगटातील रसिकांना मालिका, मालिकेची कथा आणि त्यातील पात्रं आपलीशी वाटत आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या फॅन्समध्येही वाढ होत आहे. याबाबत मला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. एका मुलीने ही मालिका पाहिली. ही मालिका पाहण्याआधी ती मुलगी माझी फॅन नव्हती. मात्र 'जाडू बाई जोरात' मालिकेतील माझी व्यक्तीरेखा तिनं पाहिली आणि त्याच्या प्रेमातच ती पडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने मला एक मेसेज पाठवला आणि मालिकेतील भूमिका आवडत असल्याचे तिने आवर्जून सांगितले. माझ्या व्यक्तीरेखेतील स्मार्टनेस, क्युटनेस आणि खट्याळपणा भावत असल्याचे तिने या मेसेजमध्ये सांगितले. अशा प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटतं.
 
छोट्या पडद्यावर काम करायला कितपत भावतं आणि काय आहे कारण ?
 

छोट्या पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारण्यास मिळतात याचा आनंद वाटतो. कलाकाराला नेहमीच नाविन्यपूर्ण काम करायला आवडते. तेच माझ्याबाबतीत आहे आणि मी स्वतःला नशीबवान समजते की मला विविध प्रकारच्या भूमिका विविध मालिकांमध्ये साकारण्याची संधी लाभली. 'शक्ती' या मालिकेत मी तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. त्यात ती त्यांची गुरु असते. 'पहेरेदार पिया की' या मालिकेतील भूमिकाही वेगळी होती. या मालिकेतील माझी भूमिका इतरांवर खार खाणारी असली तरी ती तितकीच प्रेमळ होती. अशा विविधरंगी भूमिका साकारणं मला आवडतं.
 
 
मध्यंतरी छोट्या पडद्यावरील 'पहेरेदार पिया की' मालिकेमुळे वाद निर्माण झाला होता. या वादाकडे आपण कसं पाहता ?
 

काळानुरुप आणि वेळेनुसार समाजात बदल घडत असतात. सिनेमा, मालिका किंवा नाटक ही मनोरंजनाची माध्यमंसुद्धा समाजाचा आरसाच असतात. त्यामुळे समाजात घडणारे बदल हे सिनेमा,मालिका आणि नाटकांमध्ये पाहायला मिळतात. आता 'पहेरेदार पिया की' मालिकेबाबतही असंच काहीसं घडत आहे. या मालिकेचा मूळ उद्देश वेगळाच होता.या मालिकेत लहान मुलाच्या सुरक्षेसाठी किंवा जबाबदारीसाठी तिला लग्न करावे लागते. पत्नीच पतीची कायम रक्षण करु शकते. म्हणून तिचं लग्न या मुलाशी लावलं जातं. मात्र त्यावर मोठा वाद निर्माण झाला. ज्यांनी मालिका पाहिलीच नव्हती त्यांनी याचा विनाकारण वाद केला असं मला वाटतं. फक्त प्रोमोमध्ये लहान मुलगा सिंदूर भरताना दाखवला आणि त्यावरुन वाद निर्माण झाला. मात्र वाद निर्माण करण्याआधी सिनेमा असो किंवा मालिका किंवा मग नाटक ते पाहा त्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया द्या असं मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं.
 
आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
 
'सिमरन' या आगामी हिंदी सिनेमात मी अभिनेत्री कंगणा राणौत हिच्या आईची भूमिका साकारली आहे. ज्यावेळी कंगणाला भेटली त्यावेळी मला पाहून ती म्हणाली की, “इन्हें मेरी मॉम मत बनाओ, कितनी सुंदर और फिट है किशोरीजी”.आता हा कंगणाच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. मात्र मी या सिनेमात साकारलेली आईची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या लेकीबाबत खूप काळजी करणारी असते. या भूमिकेला विविध शेड्स आहे. याशिवाय 'आप के कमरें मे कोई रेहता हैं' या हॉरर-कॉमेडी सिनेमातही मी काम केले आहे.यांत माझी वेगळी भूमिका पाहायला मिळेल.यांत मी एका वकीलाची भूमिका साकारली आहे. याशिवाय हॉलीवुड सिनेमामध्येही काम केले आहे. हार्टबीट असं या हॉलीवुडपटाचं नाव आहे.याशिवाय एक मराठी सिनेमा '15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी' अजूनही रिलीज होऊ शकलेला नाही.अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये रसिकांना पाहायला मिळणार आहे.
 
 
आगामी काळात आपण वेबसिरीजमध्येही काम करणार का ?
 

दिवसेंदिवस वेबसिरीज हा प्रकार नेटिझन्स आणि तरुणाईमध्ये सुपरहिट ठरत आहे. त्याची लोकप्रियता पाहता वेबसिरीजही वाढल्या आहे. या वेबसिरीजमध्ये काम करायला मलाही आवडेल. सध्याच्या युगात मनोरंजनाची माध्यमं खूप वाढली आहेत. आजचा रसिक खूप सजग आणि तितकाच अॅलर्ट झाला आहे. मनोरंजनासाठी कुठल्या अमुक एका माध्यमावर तो अवलंबून राहत नाही. निष्ठावान रसिक किंवा फॅन मिळणं यालाही नशीब लागतं एवढंच मी शेवटी सांगेन.  
Web Title: Fate to get loyal receipts - Kishori Shahane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.