मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचे वडील माधव लिमये यांचे नुकतेच निधन झाले आहे. भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बाबांसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला 'रेस्ट इन पीस बाबा' असे कॅप्शन दिले होते. त्यानंतर आता भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर आता एकंदरीत या काळात तिला कोणकोणत्या अनुभवातून जावे लागले हे सांगितले आहे.

भाग्यश्री लिमये हिने इंस्टाग्रामवर लिहिले की, हा काळ कठीण आहे. आपल्या सगळ्यांसाठीच. मी यात एकटी नाही. माझे बाबा कोरोना ने गेले. इतक्या झटक्यात ही घटना घडली की आपल्या हातात खरंच काही नाही या सत्याची अनुभूती पुन्हा एकदा झटका देऊन गेली. माझ्या कोणत्या ही विश्वासावरचा माझाच विश्वास उडाला. कोणत्याच गोष्टीत तथ्य नाही हे उमजलं. काहीच आपल्या हातात नाही तर मग जगण्यात काय अर्थ असा विचार डोक्यात येणं स्वाभाविकच.


ती पुढे म्हणाली की, इथे बाबा आयसीयूमध्ये असताना, त्यांचं जाणं निश्चित आहे हे माहीत असताना, आपण केलेले कोणतेही प्लॅन्स किती एकतर्फी असतात हे दिसताना, पलीकडच्या वॉर्ड मध्ये नवीन जन्म होत असताना मी पाहायचे. वाटायचं, काय उपयोग या जगात येऊन. उद्या तुम्हाला ही 'आयुष्य' या नावाच्या मायाजळातून जावं लागणार आहे. स्वतःची प्रिय व्यक्ती गमवावी लागणार आहे. आयुष्य या कॉन्सेप्टचा राग आला होता मला. आपल्या या अख्ख्या प्रवासात आपला स्वतःचा साधा खारीचा ही वाटा नाही, हे असलं आयुष्य का कुरवाळत बसायचं? सगळ्या आशा अपेक्षा नाहीश्या होणं म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळलं.


शेवटच्या दोन दिवसात बाबांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यांना कोव्हिड अतिदक्षता विभागातून मेडीकल आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांनी ही लढाई जिंकली असा समज माझ्या घरच्यांचा झाला. पण पोस्ट कोव्हिड परिणामांनी बाबांची तब्येत सुधारणार नाही आणि काहीच क्षण बाबा माझ्याबरोबर असणार आहेत याची कल्पना फक्त मलाच होती, असे भाग्यश्रीने पोस्टमध्ये म्हटले.


तिने पुढे लिहिले की, २० दिवसांनी मी पहिल्यांदा बाबांना इतक्या जवळून पाहिलं. रोखलेले अश्रु खुपत होते. त्यांना ही आणि मलाही. आम्ही एकमेकांचे हात हातात घेऊन फक्त एकमेकांकडे बघत राहिलो. कदाचित काय घडणार आहे हे पहिल्यांदाच निश्चित माहीत असणारे आम्ही दोघे ही एकमेकांसमोर आलो होतो. दोघांनाही एकमेकांना सत्याची जाणीव नव्हती करून द्यायची. आयुष्याचं रहस्य, त्यातलं सत्य हे कळणं अशक्य आहे पण तो स्पर्श, या जगात माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांचा स्पर्श मात्र खरा जाणवला.


या खोट्या जगात, फक्त भावना याच खऱ्या. या भावना मनात घर करतात हेच खरं. जगायचंय, फक्त या भावना अनुभवण्यासाठी. हेच सत्य आहे. बाकी काही नाही, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'In this false world, only feelings are real', Bhagyashree Limaye shared emotion on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.