Dhanashree Kadgaonkar exit from serial Tuzyat Jeev Rangala | तुझ्यात जीव रंगला मालिकेतील ही लोकप्रिय व्यक्ती घेणार प्रेक्षकांचा निरोप
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील ही लोकप्रिय व्यक्ती घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला आता रंजक वळणावर आली आहे. राणादा-अंजली यांच्यातील प्रेम, राणादाचा मृत्यू , तो नसताना नंदिता वहिनींनी केलेलं कटकारस्थान आणि पुन्हा मालिकेमध्ये राणादाची झालेली एण्ट्री असे अनेक चढउतार मालिकेमध्ये पाहायला मिळाले. या साऱ्यामध्ये नंदिता वहिनींनी उत्तमरित्या अभिनय करत भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला. त्यांच्यामुळे मालिकेची रंगत खऱ्या अर्थाने वाढली होती. मात्र आता यापुढे मालिकेमध्ये नंदिता वहिनी प्रेक्षकांना दिसणार नाही. लवकरच त्या या मालिकेचा निरोप घेणार आहेत. म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. 

धनश्री काडगांवकरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. या मालिकेमध्ये लवकरच राणादा पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून नंदिता वहिनींची आता एक्झिट होणार आहे.

धनश्रीने फेसबुकवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यावरुन हे फोटो तिच्या अखेरच्या दिवसाच्या चित्रीकरणाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान,नंदिताच्या एक्झिटनंतर राणादाची मुलगी “लक्ष्मी रणविजय गायकवाड” हिची देखील नव्याने एण्ट्री होणार आहे. त्यामुळे ही मालिका आता आणखीनच रंजक होणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ३ ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील राणादा उर्फ हार्दिक जोशी, पाठक बाई उर्फ अक्षया देवधर, गोदाक्का उर्फ छाया सानगावकर, नंदिता उर्फ धनश्री काडगांवकर, बरकत उर्फ अमोल नाईक या सगळ्या कलाकारांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.

 

Web Title: Dhanashree Kadgaonkar exit from serial Tuzyat Jeev Rangala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.