ठळक मुद्देइंडियन आयडल या कार्यक्रमाचे निर्माते आणि सोनी वाहिनी यांनी एकत्रित मिळून अनू मलिकच्या कमबॅकचा निर्णय घेतला आहे. अनू मलिकची या कार्यक्रमातील शेरो शायरी प्रेक्षकांना प्रचंड आवडते

इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. आता या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाच्या जोरदार तयारीला आता सुरुवात देखील झाली आहे. इंडियन आयडलच्या या नव्या सिझनमध्ये म्हणजेच इंडियन आयडल 11 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा अनू मलिक या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

इंडियन आयडल हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. अनू या सिझनमध्ये परतणार असल्याचे मिड डे या वर्तमानपत्राने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. त्यांच्या वृत्तानुसार, या कार्यक्रमाचे निर्माते आणि सोनी वाहिनी यांनी एकत्रित मिळून अनू मलिकच्या कमबॅकचा निर्णय घेतला आहे. अनू मलिकची या कार्यक्रमातील शेरो शायरी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 2004 पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात तोच परीक्षकांची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमातील त्याचे परीक्षण त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडते.  

अनू मलिकने विशाल दादलानी आणि नेहा कक्करसोबत चित्रीकरणाला सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. इंडियन आयडलच्या गेल्या सिझनला खूपच चांगला टीआरपी मिळाला होता. हा सिझन आतापर्यंतच्या सगळ्या सिझनपैकी सगळ्यात जास्त पाहिला गेला होता. पण याच दरम्यान हा कार्यक्रम एका कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकला होता. गायिका श्वेता पंडितने अनूवर लैंगिक छळाचा आरोप केला होता आणि त्याचमुळे अनुला हा कार्यक्रम सोडावा लागला होता. त्यामुळे अनूच्या जागेवर कोणताही परीक्षक घेण्याऐवजी दर आठवड्याला आपल्याला एक वेगळी व्यक्ती परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळत होती. गेल्या सिझनमध्ये त्याची रिप्लेसमेंट आणण्यात आली नसल्याने आता या सिझनमध्ये अनूच परीक्षकाच्या खुर्चीत बसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अनूने इंडियन आयडल 10 सोडल्यानंतर एक निवेदन मीडियाला दिले होते. त्यात त्याने म्हटले होते की, मी माझ्या कामावर सध्या लक्ष केंद्रित करू शकत नसल्याने मी या कार्यक्रमातून काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहे. माझ्या या निर्णयाला वाहिनीतील मंडळीने देखील संमती दिली आहे. 


Web Title: Anu Malik to Return As Indian Idol Judge, Shooting Promo With Vishal Dadlani, Neha Kakkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.