Agnihotra serial season 2 Fist Teaser Out | १० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘अग्निहोत्र २’ रसिकांच्या भेटीला, पाहा पहिला टिझर
१० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘अग्निहोत्र २’ रसिकांच्या भेटीला, पाहा पहिला टिझर

तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह छोट्या पडद्यावर सुरु होत आहे. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे ‘अग्निहोत्र’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘अग्निहोत्र २’साठीही जोरदार तयारी सुरु झालीय. अग्निहोत्र २ मध्ये कोणते कलाकार असतील याचीही उत्सुकता वाढलीय. 

https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/2592184754194253/


अग्निहोत्र २’ विषयी सांगताना सतीश राजवाडे म्हणाले, ‘१० वर्षांचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्रच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणं हे भारावून टाकणारं आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आहे. जुन्या मालिकेचा आशय आणि मांडणी हे प्रत्येकानेच पाहिले असल्याने तो दर्जा टिकवणं हे आमच्यासाठीही आव्हान आहे. परंतु अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक चांगली कलाकृती मराठी रसिकांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न असेल.’

‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेविषयी सांगताना कथाकार श्रीरंग गोडबोले म्हणाले,  ‘कुटुंबापासून दूर गेलेली माणसे जेव्हा आपल्याच भूतकाळातील पाळामुळांचा शोध घेत जातात तेव्हा निश्चितच एक गूढ जन्माला येतं आणि तेच गूढ याही मालिकेचा आत्मा आहे. आजवर केलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्र ही मालिका खूपच जवळची आहे. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारासाठी ती तितकीच महत्त्वाची आहे.’‘अग्निहोत्र २’चा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आणि या टिझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे ‘अग्निहोत्र २’ ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


 


Web Title: Agnihotra serial season 2 Fist Teaser Out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.