'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'मधील अदिती आणि सिद्धार्थचा विवाह होणार गुळपोळी स्टाईलने .
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 13:19 IST2021-12-23T13:12:29+5:302021-12-23T13:19:15+5:30
अनेक अडचणींचा सामना करत अखेर सीड आणि अदितीच्या लग्नाची वेळ समीप आली आहे.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'मधील अदिती आणि सिद्धार्थचा विवाह होणार गुळपोळी स्टाईलने .
झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujha Majha Sansarala Aani Kay Hava) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आता हि मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक अडचणींचा सामना करत अखेर सीड आणि अदितीच्या लग्नाची वेळ समीप आली आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. लग्न हे नेहमी दोन माणसांच नाही तर दोन कुटुंबांचं असतं असं नेहमी म्हंटल जातं आणि देशमुख कुटुंब जे आपल्या नात्यांना आणि परंपरांना जपून आहेत, त्यांच्या गुळपोळीला होणारं लग्न म्हणजे एका सोहळ्यापेक्षा कमी नसणार यात शंकाच नाही.
सीड आणि अदितीच्या लग्नात सर्व पारंपरिक विधी संपन्न होणार असून प्रेक्षकांना मोठ्या कुटुंबाचं अस्सल गावाकडचं मराठी लग्नं पाहायला मिळणार आहे. हि प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. या पारंपरिक सोहळ्यात मुहूर्त मेढ, चुडा भरणे, सवाष्ण भोजन, मेहेंदी या सगळ्या विधी पार पडणार असून त्यांच्या दोघांच्या हळद समारंभाची हळद देखील घरी कुटली जाणार आहे. गावाकडे लग्न हे अगदी साग्रसंगीत आणि थाटामाटात होतं आणि हा सगळा थाट प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. हा लग्नसोहळा विशेष भाग प्रेक्षकांना रविवार २६ डिसेंबर रोजी २ तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल..