आमदार प्रणिती शिंदे बनल्या खासदार; विजयानंतर सोलापुरात सर्वत्र जल्लोष
By Appasaheb.patil | Updated: June 4, 2024 18:26 IST2024-06-04T18:23:17+5:302024-06-04T18:26:21+5:30
Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

आमदार प्रणिती शिंदे बनल्या खासदार; विजयानंतर सोलापुरात सर्वत्र जल्लोष
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या खासदार झाल्या आहेत. मोठया मताधिक्क्याने विजय प्राप्त केल्याबद्दल सोलापुरात सर्वत्र जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. शहरात जोरदार पाऊस पडत असून पावसातही कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. प्रणिती शिंदे या ८१ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अद्याप झाली नाही.
दरम्यान, काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात जल्लोष केला. गुलालाची उधळण करीत एकमेकांना मिठाई खाऊ घालत आनंद साजरा केला. २३ फेरीअखेर प्रणिती शिंदे यांना ५ लाख ९२ हजार १८० मते मिळाली असून भाजपाचे उमदेवार राम सातपुते यांना ५ लाख ११ हजार ३१ मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना ८१ हजार १४९ मतांची आघाडी मिळाली आहे. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून आ. प्रणिती शिंदे तर भाजपाकडून राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत प्रणितींनी मोठे मताधिक्क घेत विजय संपादन केले. विजयानंतर सोलापूर शहरात सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांनी विजयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.