आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:55 IST2026-04-08T16:53:32+5:302026-04-08T16:55:06+5:30
Hyderabad Viral News: चोरीला गेलेल्या बाईकची आशा सोडून दिलेल्या एका व्यक्तीला चक्क ट्रॅफिक पोलिसांच्या ई-चलनमुळे आपला चोर सापडला आहे.

आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
तंत्रज्ञान कधी आणि कसं मदतीला येईल याचा नेम नाही. चोरीला गेलेल्या बाईकची आशा सोडून दिलेल्या एका व्यक्तीला चक्क ट्रॅफिक पोलिसांच्या ई-चलनमुळे आपला चोर सापडला आहे. चोराने वाहतुकीचा नियम मोडला आणि त्याचा फोटो थेट मूळ मालकाच्या इनबॉक्समध्ये पोहोचल्याने या प्रकरणाला फिल्मी वळण मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेल्या या फोटोमध्ये चालकाचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून संबंधित व्यक्तीने बाईक शोधून देण्याची आणि चोरला अटक करण्याची पोलिसांना विनंती केली आहे.
फैसल रहमान यांची दुचाकी ३ महिन्यांपूर्वी चोरीला गेली होती. त्यांनी हबीब नगर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली, मात्र पोलिसांना चोराचा सुगावा लागत नव्हता. अखेर आपली बाईक आता कधीच मिळणार नाही, असे समजून रहमान यांनी आशा सोडून दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक एसएमएस तपासला. रहमान यांना आलेला मेसेज वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलच्या ई-चलानचा होता. जेव्हा त्यांनी चलनाचा तपशील तपासला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चलनात जोडलेल्या सीसीटीव्ही फोटोमध्ये एक तरुण त्यांचीच बाईक चालवताना दिसत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा अतिशय स्पष्टपणे दिसत आहे. ज्या गुन्हेगाराला पोलीस ३ महिने शोधू शकले नाहीत, त्याचा फोटो तंत्रज्ञानामुळे थेट मालकापर्यंत पोहोचला. ज्या गुन्हेगाराला पोलीस तीन महिने शोधू शकले नाहीत, त्याचा फोटो थेट माझ्या मोबाईलमध्ये आला, असे रहमानने म्हटले आहे.
Dear @HYDTP@hydcitypolice
— Faisal Rahman (@rahman0528) April 7, 2026
My vehicle was stolen 3 months ago, and an FIR has already been registered at Habeeb Nagar Police Station.
Today, I received a traffic challan for the same vehicle, and the image clearly shows the thief’s face
I kindly request you to look into this pic.twitter.com/2KaWKn1rgC
रेहमान यांची पोलिसांना विनंती
मिळालेला फोटो रहमान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला. त्यांनी हैदराबाद वाहतूक पोलीस आणि शहर प्रशासनाला टॅग करून विनंती केली की, "या फोटोचा वापर करून गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्यात यावी आणि माझी बाईक परत मिळवून द्यावी."
नेटकऱ्यांचा संताप
ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही वापरकर्त्यांनी विचारले की, जे तंत्रज्ञान चलन फाडण्यासाठी वापरले जाते, ते गुन्हेगारांना पकडण्यासाठी का वापरले जात नाही? अनेकांनी चोरीला गेलेल्या वाहनांच्या तक्रारीनंतर होणारा विलंब आणि पोलिसांकडून होणाऱ्या कमकुवत पाठपुराव्याबद्दल आपले कटू अनुभव सांगितले. काही सकारात्मक प्रतिक्रियांमध्ये, टेक्नोलॉजीमुळे चोर पकडला गेल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. आता या पुराव्याच्या आधारे हैदराबाद पोलीस संबंधित व्यक्तीला किती लवकर अटक करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.