रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना!

By सुधीर राणे | Published: May 6, 2024 12:52 PM2024-05-06T12:52:24+5:302024-05-06T12:53:16+5:30

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency staff sent to 332 polling stations with materials | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना!

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ३३२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून  सोमवारी २० टेबलवरून साहित्य वाटप करण्यात आले. ते साहित्य घेऊन २३२४ अधिकारी, कर्मचारी व पोलिस एसटी, जीप गाड्यांच्या मदतीने कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर रवाना झाले.

दरम्यान , कायदा व  सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.  मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर मतदान साहित्य वाटप प्रक्रिया आज, सोमवारी झाली.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसिलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसिलदार संकेत यमगर आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, प्रतिनिधी, पोलिस, होमगार्ड, मतदान सहाय्यक प्रतिनिधी अशा २३२४ कर्मचाऱ्यांनी आपापल्या केंद्रातील सर्व साहित्य ताब्यात घेतले.काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

मतदान केंद्रांवर ४७ झोनल अधिकारी ठेवणार नियंत्रण 

कणकवली विधानसभा मतदार संघातील ३३२ केंद्रासाठी सोमवारी सकाळपासून साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी २० टेबल कणकवली महाविद्यालयाच्या  पटांगणावरील मंडपात मांडण्यात आली होती.  ईव्हीएम व व्हिव्हीपॅट मशिन आणि स्टेशनरी असे साहित्य तसेच  अधिकारी , कर्मचारी ४५ एसटीच्या गाड्या व ५ जीप गाड्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले.

३३२ केंद्रांपैकी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन व तीन, पोलिस कर्मचारी तसेच दिव्यांगांसाठी स्वयंसेवक, पाळणाघरासाठी अंगणवाडी अथवा आशा स्वयंसेविका व व्यवस्थापक तैनात असणार आहेत. याशिवाय ४७ झोनल अधिकारी व ३८ मायक्रो ऑब्झर्व्हर अधिकारीही असून त्यांना स्वतंत्र गाड्या देण्यात आलेल्या आहेत. या झोनल अधिकारी व मायक्रो ऑब्झर्व्हर अधिकाऱ्यांची वाहने तसेच मतदान साहित्य घेऊन जणाऱ्या बस जीपीएस यंत्रणेने जोडण्यात आली आहेत.

विशेष मतदान केंद्र !

वागदे येथील ३०७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी तर ओसरगाव येथील ३३२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी असतील. देवगड तालुक्यातील जामसंडे येथील मतदान केंद्रावर युवा कर्मचारी कार्यरत असणार आहेत.ही तीन विशेष मतदान केंद्रे कणकवली विधानसभा मतदार संघात तयार करण्यात आली आहेत.

मतपेट्या एच.पी.सी.एल.सभागृहात जमा करणार !

मतदान झाल्यानंतर ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिन्स व साहित्य कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात एकत्रित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य एकत्रित केल्यानंतर या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिन्स रत्नागिरी येथे पाठविण्यात येतील. तसेच तेथील स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात येतील. त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल. तर त्याच ठिकाणी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency staff sent to 332 polling stations with materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.