पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:07 IST2025-02-07T13:06:53+5:302025-02-07T13:07:26+5:30
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ...

पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळपोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांना दिली. रुपेश बबन सकपाळ (वय ३३, रा. कात्रज, पुणे) असे पर्यटकाचे नाव आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंटवर घडली. याप्रकरणी तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (५७), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (१८), परवीन शराफत शेख (४२), साजमीन शराफत शेख (१९), तलाह करामत शेख (२६, सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता. कुडाळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी हे पर्यटक थांबले. चहा घेताना एका कपात माशी पडली. त्यामुळे त्यांनी हा चहा बदलून द्या, असे सांगितले. त्यावरून हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. हॉटेल व्यावसायिकांसह अन्य काही जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला रस्त्यावर झोपविले आणि मारहाण केली.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस ठाण्याची टीम घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. त्यानंतर पोलिसांच्यावतीने या घटनेविरोधात तक्रार देण्यात आली.