यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार - उदयनराजे भोसले
By दीपक शिंदे | Updated: April 26, 2024 13:52 IST2024-04-26T13:52:04+5:302024-04-26T13:52:14+5:30
'काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला'

यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार - उदयनराजे भोसले
सातारा : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
महाराष्ट्राच्या मातीत अनेक चळवळी उदयास आल्या, त्यामध्ये स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रतिसरकार यांचे मोठे योगदान देशाच्या उभारणीच झाले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार हा लोककल्याणाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरते वापर केला पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात होऊन गेले तरी देखील काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याची सुचले नाही.
काँग्रेसला आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड हे सूत्र लागू होतं. यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडणार आहोत. काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला, त्यांनाही यशवंतरावांना भारतरत्न द्यावा असे वाटले नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत जाहीर सभा होणार आहे. या सभेतच यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार आहे, असे उदयनराजे म्हणाले.