Satara: पाटणमध्ये उद्धवसेनेच्या महाआक्रोश मोर्चाला शिंदेसेनेचे प्रतिमोर्चाने उत्तर, पोलिसांची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 18:20 IST2024-09-28T18:19:45+5:302024-09-28T18:20:07+5:30
दोन्ही मोर्चे समोरासमोर आल्याने पोलिसांची कसरत

Satara: पाटणमध्ये उद्धवसेनेच्या महाआक्रोश मोर्चाला शिंदेसेनेचे प्रतिमोर्चाने उत्तर, पोलिसांची कसरत
कोयनानगर : पाटण तालुक्यातील निकृष्ट कामाविरोधात उद्धवसेनेने शुक्रवारी महाआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. त्याला शिंदेसेनेने प्रतिमोर्चा काढत आव्हान दिले. दोन्ही मोर्चामुळे पाटण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे परिस्थिती हाताळताना पोलिस प्रशासनाची तारेवरची कसरत झाली.
उद्धवसेनेचा आक्रोश मोर्चा शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पाटण पंचायत समिती कार्यालयापासून सुरू झाला. त्यानंतर शिंदेसेनेही घोषणा देत उद्धवसेनेच्या मोर्चाच्या पाठीमागून प्रतिमोर्चा काढण्यास सुरुवात केली. यावेळी काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना दोन्ही मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तारांबळ उडाली. उद्धवसेनेचा मोर्चा झेंडा चौकात थांबविण्यात आला. त्यामुळे जिल्हाप्रमुख हर्षद कदम व पोलिस अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक उडाली. मोर्चा लायब्ररी चौकात गेला व त्याठिकाणीच तहसीलदार अनंत गुरव यांना निवेदन दिले.
दुसरीकडे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नवीन बसस्थानक परिसर दणादून सोडला. शिंदेसेनेचे सर्व कार्यकर्ते आक्रमकपणे पुढे मार्गस्थ होत असताना पोलिस प्रशासनाने धांडेपूल याठिकाणी थांबवले. त्याठिकाणीच शिंदेसेनेने उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांना निवेदन दिले.
उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम म्हणाले, ‘आमच्या मोर्चास मागून येत भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. पोलिसांनी सतर्कतेने परिस्थिती हाताळत प्रतिबंध केला. तालुक्यात असा प्रकार कधीही नव्हता. प्रतिमोर्चात ठेकेदारच जादा होते. यातील अनेकांना यापूर्वी पाटणकरांनी व्यवसायात उभे केले ते आज त्यांच्यासोबत राहिले नाहीत. निकृष्ट कामांबाबत पालकमंत्री व लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत का?