पृथ्वीराज चव्हाणांचं ठरलं?; उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविण्यावर म्हणाले की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 15:19 IST2019-09-30T15:17:13+5:302019-09-30T15:19:47+5:30
शरद पवार, सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यात सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांनी उभं राहावं की नाही यावर चर्चा सुरु आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचं ठरलं?; उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविण्यावर म्हणाले की...
कराड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक विधानसभेसोबत होत आहे. या जागेवर आघाडीकडून कोणाला उभं करायचं यावर चर्चा सुरु आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनहीपृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला पाठिंबा मिळत होता.
मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणूक लढवावी यावर काँग्रेसचे श्रेष्ठीही विचार करत आहेत. शरद पवार, सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यात सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांनी उभं राहावं की नाही यावर चर्चा सुरु आहे. मात्र खुद्द पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी उत्सुक नाहीत. कराड दक्षिण या विधानसभा जागेसाठी चव्हाण आग्रही आहे. याबाबत 2 दिवसांत भूमिका स्पष्ट होईल असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.
याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्त्यांची चर्चा सुरु आहे. लवकरच मी भूमिका जाहीर करेन असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले. मात्र कराडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळ्यावत पृथ्वीराज चव्हाण यांची मुलगी अंकिता खोत यांनी सांगितले होते की, सध्या विधानसभा की लोकसभा बाबा कोणती निवडणुक लढवणार याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. परंतु बाबांनी कराड विधानसभेचीच निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. त्याचप्रमाणे विरोधक म्हणतात पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईमध्ये असण्याची गरज नाही आहे. परंतु चंद्रकांत दादांची कृपा आणि मुख्यमंत्र्यांची मेहरबानी कराडवर आम्हाला नको आहे. त्यामुळे कराडमधला आमचा आमदार मुंबईला असणं गरज असल्याचे देखील अंकिता खोत यांनी ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे कराडला MH 50 हे खूप मोठं गिफ्ट दिल्याचं देखील त्यांनी सांगितले होते.
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंसमोर कडवे आव्हान उभे करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यासाठी साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडून तेथून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.