लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर
By सचिन काकडे | Updated: April 12, 2024 19:18 IST2024-04-12T19:17:04+5:302024-04-12T19:18:43+5:30
उमेदवारांकडून पायाला भिंगरी : गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अनेकांनी शड्डू ठोकला असून, इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघामध्ये गाठीभेटींचा धडाका सुरू करण्यात आला आहे. सध्या तरी दिग्गजांनी कऱ्हाड दक्षिण, उत्तर व पाटण मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, मतांची गोळाबेरीजही सुरू केली आहे.
एप्रिल-मे २०१९ मध्ये झालेल्या सातारा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना पराभूत केले होते. अवघ्या पाच महिन्यांतच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. शरद पवार यांनी आपले निष्ठावंत शिलेदार श्रीनिवास पाटील यांना लोकसभेच्या आखाड्यात उभे केले. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत खासदार उदयनराजेंना पराभव पत्करावा लागला.
या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना ६ लाख ३७ हजार ६२०, तर उदयनराजे भोसले यांना ५ लाख ४८ हजार ९०३ मते मिळाली. श्रीनिवास पाटील यांना कऱ्हाड, पाटण तालुक्यातून ३ लाख ४० हजार ५३९, तर उदयनराजे यांना २ लाख २९ हजार ९५२ मते मिळाली. श्रीनिवास पाटील यांनी कऱ्हाड दक्षिण, उत्तर व पाटण मतदारसंघातून तब्बल १ लाख १० हजार ५८७ इतके मताधिक्य मिळवले होते. सातारा मतदारसंघ हा उदयनराजेंचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात त्यांना १ लाख १८ हजार ८९८, तर श्रीनिवास पाटील यांनी ७२ हजार ८४७ मते मिळाली.
सद्य:स्थिती पाहता कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर व पाटण या मतदारसंघांतील मतदारांची संख्या ८ लाख ९४ हजार ७९९ इतकी आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकणाऱ्या उमेदवारांकडून प्रामुख्याने या तीन मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गाठीभेटी, बैठका, सभा तसेच छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना नेतेमंडळी हजेरी लावून मतांची गोळाबेरीज करू पाहत आहे.
जिथून पिछेहाट तिथूनच प्रारंभ..
२०१९ च्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी कराड दक्षिण, उत्तर व पाटण या तीन मतदारसंघांतून मोठे मताधिक्य मिळविले होते. या मताधिक्यामुळेच खासदार उदयनराजे भोसले यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. २०२४ ची निवडणूक श्रीनिवास पाटील लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या जागी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मागील निवडणुकीत घटलेले मताधिक्य भरून काढण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी डावपेच आखले असून या तीन मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.