LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल 

By नितीन काळेल | Published: May 9, 2024 06:52 PM2024-05-09T18:52:32+5:302024-05-09T18:57:01+5:30

३२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद : माण, फलटण विधानसभा मतदारसंघातही दिसली चुरस 

4 lakh voting from Man, Phaltan assembly constituencies in Satara for Madha Lok Sabha | LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल 

LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल 

सातारा : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीने सुमारे ६० टक्के मतदान झाले. यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ६४ टक्क्यांवर मतदान झाल्याचे समोर आलेले आहे. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या विधानसभेच्या दोन मतदारसंघातील ४ लाख २० हजार मतदारांनी हक्क बजावला आहे.

सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघ पसरला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस हे विधानसभेचे मतदारसंघ येतात. तर साताऱ्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झाले. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ होती. तरीही अनेक केंद्रावर वेळ संपून गेली तरी मतदान सुरू होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे ६० टक्के मतदान झालेले आहे.

माढा मतदारसंघात एकूण १९ लाख ९१ हजार ४५४ मतदार होते. त्यातील ११ लाख ९२ हजार १९० मतदारांनी हक्क बजावला आहे. यामध्ये ६ लाख ५२ हजार ६१७ पुरुष तर ५ लाख ३९ हजार ३४८ महिलांनी मतदान केले आहे. तसेच इतर मतदारांचे प्रमाण २५ इतके आहे. पुरुष मतदारांच्या मतदान टक्केवारीचे प्रमाण सुमारे ६३ आणि महिलांचे ५६ इतके आहे. त्याचबरोबर माढ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघात ६४ टक्क्यांवर मतदान झाले आहे. यानंतर माढा विधानसभा मतदारसंघात ६१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. तर माळशिरसमध्ये ६०.२८ टक्के, सांगोला सुमारे ६० टक्के, माण ५८.४२ टक्के मतदान पार पडले आहे. तर करमाळा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजे सुमारे ५५ टक्के मतदान पार पडले आहे.

माणमध्ये २ लाख मतदाते..

माण विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५० हजार मतदार आहेत. त्यातील २ लाख ४ हजार ४६८ जणांनी हक्क बजावला. तर फलटण विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ९९९ पात्र मतदार होते. या मतदारसंघात २ लाख १५ हजार ८१५ मतदारांनी कर्तव्य पार पाडले.

मतदारसंघातील ३२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद..

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे ९ आणि अपक्ष २३ जणांचा समावेश होता. तर सातारा जिल्ह्यातील १० आणि सोलापूरमधील २२ उमेदवार होते. मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातच प्रमुख लढत दिसून येत आहे. मतदानामुळे ३२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले आहे.

Web Title: 4 lakh voting from Man, Phaltan assembly constituencies in Satara for Madha Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.