माढ्यात लढत दुरंगीच, पण रिंगणात ३२ जण; भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा महत्त्वाची 

By नितीन काळेल | Published: April 23, 2024 06:49 PM2024-04-23T18:49:37+5:302024-04-23T18:52:38+5:30

दिग्गज नेते सभातून रान उठवणार

32 candidates are fighting between Dharisheel Mohite-Patil and Ranjitsinh Naik-Nimbalkar In Madha Lok Sabha Constituency | माढ्यात लढत दुरंगीच, पण रिंगणात ३२ जण; भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा महत्त्वाची 

माढ्यात लढत दुरंगीच, पण रिंगणात ३२ जण; भाजप-राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा महत्त्वाची 

सातारा : सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या माढा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून ३२ उमेदवार रिंगणात आहेत. तरीही खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच होणार आहे. या निवडणुकीत दोन्हीही प्रमुख पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राज्य आणि देशातील दिग्गज नेते सभांतून रान उठवणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत एकूण ३२ जण उतरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते-पाटील मैदानात आहेत. तर भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बहुजन समाज पार्टीकडून स्वरूपकुमार जानकर, वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. तसेच इतर काही राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. तरीही खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांतच होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे धैर्यशील मोहिते यांना पक्षात घेऊन उमेदवारीची माळ गळ्यात घातली. त्यामुळे १० वर्षांनंतर मोहिते-पाटील यांच्या घरातील व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी सध्या महायुतीतील नाराज नेत्यांचीच रसद दिसून येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेकजण प्रचारात दिसून येत आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील उत्तम जानकर, तर राजकीय वैर विसरून मोहिते यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. फलटणचे राजे गटही धैर्यशील यांच्या मागे उभा राहिला आहे. काही उघडपणे प्रचारात आहेत. तर काहींनी तटस्थ राहून आतून मदत सुरू केली आहे.

तसेच शेकापचीही ताकद मोहिते यांच्या पाठीशी आहे. तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठीशी पाच आमदारांचे बळ आहे. माणमधून आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, करमाळ्याचे संजय शिंदे, माढ्याचे बबनदादा शिंदे आणि माळशिरसचे राम सातपुते यांनी रणजितसिंह यांच्यासाठी मैदान मारण्याची तयारी केली आहे. तर फलटणचे आमदार दीपक चव्हाण युतीत असले तरी त्यांची भूमिका ही रामराजे गटावर अवलंबून आहे.

माढ्याची निवडणूक दुरंगी होणार असून भाजप आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिक वेळ दिलेला आहे. त्यांच्या दहिवडी, फलटण, अकलूज, सांगोला, करमाळा आणि मोडनिंब या ठिकाणी सभा होणार आहेत.  तर भाजप उमेदवार रणजितसिंह यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

राजकीय पक्षांचे ९, अपक्ष तब्बल २३ जण रिंगणात..

माढ्याच्या रिंगणात एकूण ३२ उमेदवार आहेत. यामध्ये राजकीय पक्षांचे नऊ उमेदवार आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, बसपा, वंचितचा उमेदवार आहे. तर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे सिद्धेश्वर आवारे, भारतीय जवान किसान पार्टीचे गोपाळ जाधव, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून रामचंद्र घुटुकडे, स्वराज्य सेना (महाराष्ट्र) सत्यवान ओंबासे, रिपाइं (ए) चे संतोष बिचुकले यांचा समावेश आहे. अपक्ष म्हणून अनिल शेडगे, अमोल करडे, अशोक वाघमोडे, काशीनाथ देवकाते, किरण साठे, संदीप खरात, गिरीश शेटे, धनाजी मस्के, नवनाथ मदने, नानासाहेब यादव, नारायण काळेल, नंदू मोरे, बळीराम मोरे, भाऊसाहेब लिगाडे, रोहित मोरे, रशीद शेख, विनोद सितापुरे, ॲड. सचिन जोरे, गणेश सरडे, राहुल सावंत, सीताराम रणदिवे, हणमंत माने आणि लक्ष्मण हाके मैदानात आहेत.

Web Title: 32 candidates are fighting between Dharisheel Mohite-Patil and Ranjitsinh Naik-Nimbalkar In Madha Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.