'या' मागणीसाठी सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 07:40 PM2021-11-29T19:40:39+5:302021-11-29T19:41:26+5:30

उद्या, मंगळवारीही हे आंदोलन कायम राहणार आहे. निर्णय झाला नाही, तर २४ तासानंतर बाह्यरुग्ण विभागात सेवा देणार नाही असा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिला आहे.

Work of resident doctors of Sangli Miraj Government Hospital wearing black ribbons for this demand | 'या' मागणीसाठी सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून काम

'या' मागणीसाठी सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून काम

googlenewsNext

सांगली : रुग्णसेवेसाठी पुरेसे डॉक्टर मिळावेत यासाठी सांगलीमिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सोमवारी काळ्या फिती लावून काम केले. तर, उद्या मंगळवारनंतर ओपीडीमध्ये रुग्णसेवा बंद करण्याचा इशाराही दिला. सांगली व मिरजेत १५० निवासी डॉक्टर्स आंदोलनात सहभागी झाले.

मंगळवारीही हे आंदोलन कायम राहणार आहे. निर्णय झाला नाही, तर २४ तासानंतर बाह्यरुग्ण विभागात सेवा देणार नाही असा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिला आहे. सांगली-मिरजेत या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. सतई यांच्यासह ऋशीकेष गावडे, सुजित शिवशरण आदींनी केले.

सांगली व मिरजेत २४० निवासी डॉक्टरांची गरज आहे, प्रत्यक्षात १६८ उपलब्ध आहेत. अपुऱ्या संख्येमुळे तातडीच्या गंभीर नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष करावे लागत असल्याचे मार्डचे म्हणणे आहे. अशीच स्थिती देशभरातही असल्याने सर्वत्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मार्डच्या शिखर संघटनेची बैठक सोमवारी सायंकाळी दिल्लीमध्ये होत आहे, त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होईल असे मार्डचे सांगली-मिरज अध्यक्ष डॉ. अक्षय सतई यांनी सांगितले.

५ सप्टेंबर रोजी पदव्युत्तरसाठी प्रवेस परीक्षा झाली, तिचा निकाल २९ सप्टेंबररोजी जाहीर झाला. उत्तीर्ण डॉक्टरांच्या नियुक्त्यांसाठी समुपदेशन फेरी अद्याप शासनाने घेतलेली नाही, त्यामुळे हे डॉक्टर्स सेवेसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. नियुक्त्या करतेवेळी आर्थिक मागासांच्या आरक्षणाचा संदर्भ विचारात घेतला जावा असा याचिकाकर्त्यांचा आग्रह आहे. त्यावर तातडीने निर्णय होण्यासाठी जलदगती न्यायालयात याचिका वर्ग करावी अशी मार्डची मागणी आहे.

Web Title: Work of resident doctors of Sangli Miraj Government Hospital wearing black ribbons for this demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.