Sangli Municipal election 2026: सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कार्यकर्त्यांत अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:03 IST2025-12-26T19:03:06+5:302025-12-26T19:03:58+5:30
पुण्यातील बैठकीकडे लक्ष

Sangli Municipal election 2026: सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कार्यकर्त्यांत अस्वस्थता
सांगली : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींमुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. २०२३ मध्ये पक्षात फूट पडली तेव्हा पक्षांतर्गत मतभेदामुळे अनेकांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण, आता एकत्रीकरणामुळे पुन्हा गळ्यात गळे घालावे लागण्याच्या शक्यतेने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांत चलबिचल आहे.
महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) राज्यात पुण्यासह विविध ठिकाणी युतीतून बाहेर पडत लढतीचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत (शरद पवार) हातमिळवणी केली आहे. हातमिळवणीचा हा पुणे पॅटर्न सांगलीतही राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सांगलीत महापालिका निवडणुकीबाबत भाजप आक्रमक स्थितीत आहे. याल तर सोबत, अन्यथा ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका अनेकदा दिसून आली आहे. या स्थितीत महायुती होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसही आपापल्या मार्गांनी निघाल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाने गेल्या आठवडाभरापासून स्वतंत्ररीत्या इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका लावला आहे. सांगली आणि मिरजेत स्वतंत्र मुलाखती घेत आपण स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहोत. असा संदेश दिला आहे. दुसरीकडे शरद पवार गट मात्र महाविकास आघाडीत कायम असल्याचे चित्र आहे.
गुरुवारी सांगलीत महाविकास आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती घेतली. आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये शरद पवार गटाचाही समावेश होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेसाठी एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली आहे. तसे व्हायचे असल्यास शरद पवार गटाला महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. सध्या तरी तसे चित्र नाही.
पुण्यातील बैठकीकडे लक्ष
सांगलीत दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याविषयी पुण्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहेत. पण, सांगलीत मात्र दोन्ही गटांनी जणू सवतासुभा मांडला आहे. इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेऊन महापालिकेचे रणांगण स्वतंत्र लढणार असल्याचा संदेश दिला आहे.
जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढणार नाहीत. किंबहुना आमचा शरद पवार गट जिल्हा परिषदेसाठी काँग्रेससोबत आघाडीसाठी बोलणी करत आहे. महापालिका क्षेत्रात हातमिळवणीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. - देवराज पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)