Sangli: बांधकामासाठीच्या खड्ड्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू, आणखी एक मुलगा गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:48 IST2025-07-15T15:48:13+5:302025-07-15T15:48:39+5:30
खेळत असताना घडली घटना

Sangli: बांधकामासाठीच्या खड्ड्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू, आणखी एक मुलगा गंभीर
जत : जाडरबोबलाद (ता. जत) येथे बांधकामासाठी खणण्यात आलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून चौदा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर एकाचा जीव वाचला. श्रवण महेश चनगोंड (वय १ वर्ष ४ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता घडली, तर करण महेश चनगोंड (२ वर्षे ५ महिने रा. जाडरबोबलाद, ता. जत) याची प्रकृती गंभीर आहे. त्यास पुढील उपचारासाठी मिरजेला हलविले आहे.
महेश चनगोंड यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या कामासाठी घराच्या शेजारीच सहा फुटाचे डबके खणण्यात आलेले आहे. त्यामध्ये पाणी साठवलेले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता चौदा महिन्याचा श्रवण व अडीच वर्षाचा करण अंगणात खेळत होते. आई घरच्या कामात व्यस्त होती. वडील महेश हे सांगली येथे फायनान्स कंपनीमध्ये काम करतात, तर आजोबा गावात गेले होते. आजी शेतात कामासाठी गेल्या होत्या.
दोन्ही मुलं घराशेजारी खेळत खेळत पाण्याने भरलेल्या डबक्यात पडली. या घटनेनंतर दोघांनाही तत्काळ पाण्याबाहेर काढून जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, श्रवण यांच्या पोटात भरपूर पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला, तर करण याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून मिरज येथे उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी पुढे पाठवून दिले. जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून श्रवण याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या घटनेची उमदी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.