Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेना-भाजप'मध्ये १९ प्रभागात थेट लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:57 IST2026-01-09T15:56:52+5:302026-01-09T15:57:31+5:30
परस्परविरोधी प्रचारामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येत आहे

Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेना-भाजप'मध्ये १९ प्रभागात थेट लढत
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष केंद्र व राज्यात एकत्र सत्तेत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र हे पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच थेट लढती होत असल्याने निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.
विशेष म्हणजे शिंदेसेना आणि भाजप यांच्यात तब्बल १९ प्रभागांमध्ये थेट सामना होत आहे. दोन्ही पक्षांकडून ताकदीचे उमेदवार मैदानात उतरविण्यात आले असून, परस्परविरोधी प्रचारामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येत आहे. याशिवाय सहा प्रभागांमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे.
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच भाजपने महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण जागावाटपाची चर्चा सुरू होताच महायुतीतील घटक पक्ष बाजूला गेले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने तर संभाव्य उमेदवारांची यादीच भाजपला दिली नाही. शिवाय जागावाटपाच्या चर्चेलाही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाले होते. पण भाजपने शिंदेसेना, जनसुराज्य व रिपाइं या पक्षासोबत जागा वाटपावर चर्चा केली. पण जागावाटपाचा तिढा सुटला नाही. अखेर शिंदेसेनाही महायुतीतून बाहेर पडली, तर जनसुराज्यलाही जागा देण्यास भाजपने असमर्थता दाखविली. रिपाइंला मात्र एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर शिंदेसेनेनेही ६५ उमेदवार रिंगणात उतरवित भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.
महायुतीतील जागावाटपावरून झालेली असमाधानाची भावना या थेट लढतींमधून स्पष्ट होत आहे. स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवार, गटनेते आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे पक्ष नेतृत्वाला अनेक ठिकाणी समन्वय साधता आला नसल्याचे चित्र आहे. परिणामी, सत्तेत एकत्र असलेले पक्षच मतदारांसमोर परस्परविरोधी भूमिका मांडताना दिसत आहेत.
या अंतर्गत संघर्षाचा फायदा विरोधकांना होणार की महायुतीतील पक्ष आपापली ताकद स्वतंत्रपणे दाखवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सांगली महापालिकेची निवडणूक यंदा विरोधकांपेक्षा महायुतीतील ‘घरातील लढाई’ म्हणूनच अधिक चर्चेत राहणार आहे.
महायुतीत कुठे दुरंगी, कुठे तिरंगी सामना
प्रभाग १६ मधील सर्वसाधारण गटातील एक जागा वगळता इतर सर्व १९ प्रभागात भाजप व शिंदेसेना आमने-सामने आहे, तर मिरजेतील प्रभाग ५,६, २० कुपवाडमधील ८, सांगलीतील १५, १७ या प्रभागात भाजप-शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात लढत होत आहे.