Sangli Municipal election 2026: उमेदवारी मिळण्याच्या शब्दावर भाजपमध्ये आले अन् जुन्या-नव्यांच्या वादात अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:18 IST2025-12-26T19:15:51+5:302025-12-26T19:18:15+5:30
जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील समर्थकांची घुसमट : स्थानिक भाजप नेत्यांकडून किनारा

Sangli Municipal election 2026: उमेदवारी मिळण्याच्या शब्दावर भाजपमध्ये आले अन् जुन्या-नव्यांच्या वादात अडकले
शीतल पाटील
सांगली : विधानसभा निवडणुकीनंतर सांगलीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्याने या नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे भाजपमध्ये आता आयाराम-गयारामचा वाद चिघळला आहे. जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्याने आलेले नेते यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष तीव्र झाला आहे. पक्षात दाखल झालेल्या माजी नगरसेवकांना नेमकी कोणती भूमिका मिळणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी एकमेकांविरोधात लढलेले उमेदवार आता एकाच पक्षात सक्रिय झाले आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महापालिका क्षेत्रात जयश्री पाटील यांचा मदनभाऊ गट मोठा आहे. भाजप पक्षप्रवेशावेळी त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवाराचा शब्द दिला होता. खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारीबाबत जाहीरपणे वक्तव्य केले होते. भाजपसह पक्षात नव्याने आलेल्या माजी नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जात होती; पण आता ऐन रणधुमाळीत भाजपमध्ये नव्याने आलेल्या माजी नगरसेवकांची घुसमट वाढली आहे.
यंदा भाजपकडे उमेदवारीसाठी ५७० हून अधिक जणांनी अर्ज केले. प्रत्येक प्रभागात एकेका जागेसाठी पक्षाचे निष्ठावंत व नव्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच सुरू आहे. त्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मुद्दा लावून धरला आहे. परिणामी उमेदवारी निश्चितीचा खेळ गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. प्रभाग नऊमध्ये माजी नगरसेवक संतोष पाटील, भाजपचे अतुल माने यांच्या उमेदवारीसाठी संघर्ष आहे. तसाच संघर्ष प्रभाग १६ मध्ये उत्तम साखळकर व सुजित राऊत, प्रभाग १९ मध्ये संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, अजय देशमुख, दहामध्ये प्रकाश मुळके, सूरज पवार, अकरामध्ये संजय कांबळे, सुजित काटे, प्रभाग १२ मध्ये धीरज सूर्यवंशी, नितीन शिंदे, प्रभाग १४ मध्ये भारती दिगडे, आशा शिंदे यांच्यातही दिसत आहे.
एकीकडे पक्षसंघटना बळकट करण्यासाठी इनकमिंग आवश्यक असल्याचे मत आहे, तर दुसरीकडे ‘आधीच कार्य करणाऱ्यांवर अन्याय होतोय’ असा आरोप जुन्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या वादामुळे उमेदवारीच्या आशेने भाजपमध्ये आलेले माजी नगरसेवक आता पक्षातील अंतर्गत राजकारणात अडकले असून, त्यांची घुसमट वाढत चालली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाआघाडीची दारे खुली
महाआघाडीकडून सध्या जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरविला जात आहे. उमेदवार याद्यांबाबत सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले काही माजी नगरसेवक उमेदवारी न मिळाल्यास पुन्हा महाआघाडीत येतील, अशी आशा नेत्यांना आहे. काही माजी नगरसेवकांना चोरीछुपे महाआघाडीच्या नेत्यांशी संवाद सुरू ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शेवटच्या दोन दिवस उलथापालथीचे
भाजपकडून उमेदवारांचा यादी शेवटच्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज व डावलले गेलेल्यांसमोर बंडखोरी अथवा अन्य पक्षातून निवडणूक लढविण्याचे पर्याय उपलब्ध असतील. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.