Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:02 IST2025-01-08T17:01:59+5:302025-01-08T17:02:31+5:30
पदाधिकारी ‘जैसे थे’; सदस्य नोंदणीकडे पाठ

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून दबदबा असलेला भाजप मतदारसंघात अस्तित्वाच्या शोधात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीला माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. संजयकाका समर्थक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पक्षीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे भाजपची धुरा पुन्हा जुन्या निष्ठावंत शिलेदारांवर आली आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप केवळ नावापुरता अस्तित्वाला होता. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत संजयकाकांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेत प्रवेश केला. तेव्हापासून तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व दिसून येत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तासगाव नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपचे कारभारी सत्तेत आले होते.
दहा वर्षांनंतर संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी महायुतीच्या फॉर्म्युला फारसा फरक पडला नाही. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने सदस्य नोंदणीचे अभियान सुरू केले आहे. या अभियानात भाजपचे संजयकाका समर्थक पदाधिकारी दिसत नाहीत. संजयकाकांनी पक्ष सोडला तरी भाजपच्या कार्यकारिणीवर काका समर्थक कार्यकर्ते काम करत आहेत. मात्र, या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या अभियानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील भाजपची धुरा पक्षाच्या परंपरागत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आली आहे.
पदाधिकारी ‘जैसे थे’; सदस्य नोंदणीकडे पाठ
भाजपकडून देशभरात पाच तारखेला सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. मात्र, या नोंदणीकडे तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. माजी खासदार संजय पाटील यांनी पक्ष सोडला. तरी त्यांचे समर्थक असणारे पदाधिकारी ‘जैसे थे’ आहेत. मात्र, या पक्ष नोंदणीकडे पदाधिकाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माजी पदाधिकाऱ्यांनी ही पाठ फिरवली आहे.
‘भाजप’ची धुरा या शिलेदारांवर
संदीप गिड्डे, स्वप्नील पाटील, महेश पाटील, दिलीप जोगळेकर, प्रसन्न गोसावी, विनय संकपाळ, प्रशांत कुलकर्णी, गोविंद सूर्यवंशी, सुभाष माळी, संतोष पोळ, इंद्रनील पाटील, सुंदर पाटील.