Sangli: ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून भंगार गोळा करणाऱ्याचा मृत्यू, मिरज रेल्वे स्थानकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:02 IST2025-08-12T14:01:45+5:302025-08-12T14:02:02+5:30
खूनप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकास ताब्यात घेतले

Sangli: ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून भंगार गोळा करणाऱ्याचा मृत्यू, मिरज रेल्वे स्थानकातील घटना
मिरज : मिरजरेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोघांच्या भांडणात एकाला ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीश मोहिते (वय ३२, रा. कोल्हापूर) याचा मृत्यू झाला. प्लॅटफॉर्म दोनवर रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला. खूनप्रकरणी रेल्वेपोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानकात भंगार बाटल्या गोळा करून तेथेच राहत होता. सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते याचा दुसऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्या सोबत दारूच्या नशेत वाद झाला. यावेळी भांडणात दुसऱ्याने त्यास ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीशला ढकलून देणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले.
मृत सतीशचे मिरज सिव्हिलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज पोलिस अधिक तपास करत आहेत.
भांडणातून घडली घटना
मिरज रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म दोन वापरात नसल्याने तेथे व्यसनी भिकाऱ्यांचा राजरोसपणे वावर असतो. बेघर मंडळी येथे वास्तव्य करतात. त्यांच्यातील भांडणातून खुनाचा प्रकार घडला आहे.