सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढणार, जयंत पाटील, विशाल पाटील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:34 IST2025-12-26T14:32:45+5:302025-12-26T14:34:13+5:30
गद्दारांना जागा दाखवू; उद्धवसेना, वंचितसोबत चर्चा करणार

सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढणार, जयंत पाटील, विशाल पाटील यांची घोषणा
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकींसाठी महाविकास आघाडी निश्चित झाली आहे. या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना सोबत असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील इतर महापालिकांमध्ये कोण सोबत येईल याचा विचार न करता सांगलीत महापालिकेसाठी स्थानिक गरजेनुसार महाआघाडी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील म्हणाले, राज्यात महायुती सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली असून, महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला शहरातील नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे सत्तेला सक्षम पर्याय देण्याची जनतेची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सर्व प्रभागांत ताकदीने लढणार असून, कुठेही मैत्रिपूर्ण लढती होणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्ष व संघटनांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठीच्या महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना हेच तीन पक्ष राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलाखत प्रक्रियेत राष्ट्रवादी (अजित पवार)चे कुठलेही नेते किंवा कार्यकर्ते सहभागी नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुपारपर्यंत मुलाखतीसाठी काँग्रेस नेते डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. दुपारनंतर ते काँग्रेसच्या बैठकीसाठी मुंबईला निघून गेले.
गद्दारांना जागा दाखवू
गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रभागातच जागा दाखवू. त्यांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देऊन आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली जाईल, असा इशारा जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना दिला.
३७५ इच्छुकांच्या मुलाखती
महापालिका निवडणुकीसाठी ३७५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यामध्ये काँग्रेसच्या २००, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या १७५ इच्छुकांचा समावेश आहे. योग्य उमेदवार निवडीत गुणवत्ता आणि जनसंपर्काला प्राधान्य दिले जाणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांची हुकूमशाही चालणार नाही
शहरातील गुन्हेगारी, चोऱ्या व दरोड्यांचे प्रमाण चिंताजनक असताना, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी डिजिटल फलक लावणाऱ्या नागरिकांनाच पोलिसांकडून नोटिसा देऊन धमकावले जात आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई होत नाही, आणि दुसरीकडे ते प्रकार उघड करणाऱ्यांवरच दडपशाही केली जाते, हे स्वीकारार्ह नाही. ही पोलिसांची हुकूमशाहीची भूमिका आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.