Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:20 IST2025-09-19T17:20:24+5:302025-09-19T17:20:51+5:30

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात : सरपंच, उपसरपंच उपोषणाच्या तयारीत

Parents are angry over the shortage of teachers at the Zilla Parishad school in Kondaiwadi, Shirala taluka sangli | Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार

Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार

शिराळा : तालुक्यातील कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेवरून पालकांचा संताप व्यक्त झाला आहे. ‘आमच्या मुलांना शिकायला शिक्षकच नसतील, तर त्यांना शाळेत पाठवून काय उपयोग’, असा प्रश्न उपस्थित करत पालकांनी बुधवारपासून (दि. १७) आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले. यावर अधिक टोकाचे पाऊल उचलत सरपंच अशोक सावंत व उपसरपंच संजय सावंत यांनी १९ सप्टेंबरपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण ४२ विद्यार्थी आहेत. नियमांनुसार तीन शिक्षकांची आवश्यकता असताना, अनेक वर्षांपासून फक्त दोनच शिक्षक कार्यरत होते. एका वर्षी तर पूर्ण शाळेची जबाबदारी एकाच शिक्षकावर होती. सध्या कागदोपत्री तीन शिक्षक दाखवले असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.

एक मुख्याध्यापक प्रशासकीय कामामुळे वारंवार अनुपस्थित राहतात, दुसरे शिक्षक एखाद्या कारणाने गैरहजर असल्यास संपूर्ण शाळेचा भार एकाच व्यक्तीवर येतो. तिसरे शिक्षक रुजू व्हायचे राहूनच गेले असल्याची पालकांची तक्रार आहे.

या ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही शिक्षक कमी असल्याची तक्रार करत आहोत. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. - अशोक सावंत, पालक व सरपंच, कोंडाईवाडी

या शाळेची पटसंख्या ४२ असून, सात वर्ग आहेत. पटसंख्येच्या नियमांनुसार, दोन शिक्षक आणि मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेतून एक, असे तीन शिक्षक मंजूर आहेत आणि ते कार्यरत असल्याचे दाखवले आहे. मी संबंधित पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावर लवकरच तोडगा काढला जाईल.’ - पोपट मलगुंडे, गटशिक्षणाधिकारी, शिराळा

Web Title: Parents are angry over the shortage of teachers at the Zilla Parishad school in Kondaiwadi, Shirala taluka sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.