फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:35 IST2024-10-29T18:18:48+5:302024-10-29T18:35:04+5:30
अजित पवार यांनी आज मतदारसंघात येऊन केलेल्या या टीकेला जयंत पाटील नेमकं कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी
Ajit Pawar Sangli ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपुरातील उमेदवार जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "इथं परिवर्तन अटळ आहे, फक्त तुमच्यात फूट पडू देऊ नका. कारण फूट पाडण्यात समोरचा माणूस तरबेज आहे. इस्लामपूरची बारामती करतो, असं हा माणूस २००९ पासून सांगतोय. सात वेळा तुम्ही संधी दिली, पण त्या बाबाने काही बारामती केली नाही, आपले बाराच वाजवले आहेत. गोड बोलणाऱ्यांना यंदा आपल्याला सुट्टी द्यायची आहे," असं म्हणत अजित पवारांनी जयंत पाटलांचा समाचार घेतला.
जयंत पाटलांवर हल्लाबोल करताना अजित पवार म्हणाले की, "यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निशिकांत पाटील यांना संधी द्या. आपण या तालुक्याला बारामतीपेक्षा चांगले बनवू. राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं? संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का? असला मुख्यमंत्री करायचा का?" असा खरमरीत सवाल अजित पवारांनी विचारला आहे.
"करेक्ट कार्यक्रम"वरून टोला
आपण विरोधकांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो, असं जयंत पाटलांवर वारंवार म्हटलं जातं. यावरूनच पाटील यांना टोला लगावताना अजित पवार म्हणाले की, "करेक्ट कार्यक्रम करायचा त्यांच्या हातात नाही. ते जनतेच्या हातात आहे. करेक्ट कार्यक्रम करून लोकांचं भलं होत नाही."
दरम्यान, अजित पवार यांनी आज मतदारसंघात येऊन केलेल्या या टीकेला जयंत पाटील नेमकं कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.