सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर

By अविनाश कोळी | Published: April 22, 2024 06:54 PM2024-04-22T18:54:58+5:302024-04-22T18:57:15+5:30

तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे

late Congress leader Prakashbapu Patil holds the record of becoming an MP five times In the Sangli Lok Sabha Constituency | सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर

सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या इतिहासात काँग्रेसचे दिवंगत नेते प्रकाशबापू पाटील यांनी  विजयाची एकमेव हॅटट्रिक नोंदविली आहे. अन्य कोणत्याही नेत्याला ही किमया साधता आली नाही. पाचवेळा खासदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९८०ची लोकसभा निवडणूक लढविली व जिंकली. त्यानंतर त्यांनी १९८४च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांना मैदानात उतरविले. प्रकाशबापूंनी ती निवडणूक मोठ्या मत फरकांनी जिंकली. त्यानंतर १९८९ व १९९१च्या निवडणुकीत पुन्हा प्रकाशबापूंनी विजय नोंदवित खासदारकीची हॅटट्रिक नोंदविली होती. या तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे होते.

लोकसभेच्या निवडणुकीत दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांनी लोकसभेच्या १९९६, १९९८ व १९९९ अशा सलग तीन निवडणुका लढविल्या. ९६ व ९८च्या निवडणुकीत त्यांनी मोठे विजय नोंदविले. खासदारकीची हॅटट्रिक त्यांनाही नोंदवायची होती. मात्र, प्रकाशबापू पाटील यांनी त्यांचा १९९९च्या निवडणुकीत पराभव केला.

त्यानंतर प्रकाशबापू पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी २००६च्या पोटनिवडणुकीसह २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजी मारली. मात्र, त्यांना २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचीही हॅटट्रिक हुकली होती. १९७१ व १९७७च्या लोकसभा निवडणुका जिंकणारे काँग्रेसचे गणपती गोटखिंडे यांनी तिसरी निवडणूक लढविली नाही.

प्रकाशबापू सर्वाधिक वेळा खासदार

सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापू पाटील यांच्या नावे सर्वाधिक वेळा खासदार होण्याचा विक्रम नाेंदला गेला आहे. त्यांनी पाचवेळा विजय मिळविला होता. विशेष म्हणजे ते एकाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. जेव्हा जेव्हा ते मैदानात उतरले तेव्हा विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली.

Web Title: late Congress leader Prakashbapu Patil holds the record of becoming an MP five times In the Sangli Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.