Sangli Crime: मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास, भामट्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:52 IST2025-09-03T13:52:03+5:302025-09-03T13:52:41+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

Sangli Crime: मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास, भामट्यास अटक
सांगली : मिरज तालुक्यातील एका गावात दाम्पत्याला मूल होण्याचे औषध देतो असे सांगून सहा लाखांच्या दागिन्यासह पलायन केलेल्या भामट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. संशयित नागेश राजू निकम (वय ३६, निमनिरगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडून मोटार, दागिने असा सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित नागेश राजू निकम हा दि. ३१ रोजी मिरज तालुक्यातील एका गावात दाम्पत्याला मूल होण्याचे औषध देतो असे सांगून सकाळी साडे नऊच्या सुमारास आला होता. दाम्पत्याला देवघरातील खोलीत बसवून निकम याने महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने एका कापडावर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर मोटारीतून मंदिरात जाऊन येतो असे सांगून निकमने पितळी हंड्यात दागिने ठेवून तो पसार झाला.
वीस मिनिटानंतर निकम हा घरी परत आला नाही. त्यामुळे दाम्पत्याने त्याची शोधाशोध सुरू केली. परंतू तो आढळून आला नाही. त्यामुळे फसवणूक केल्याचे लक्षात आले. महिलेने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या प्रकरणातील भामट्याचा शोध घेत असताना सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी सागर लवटे यांना निमनिरगाव येथील नागेश निकम याने केला असून तो सांगलीत फिरत असल्याची माहिती मिळाली. माधवनगर येथील जुना जकात नाका परिसरात संशयित मोटार दिसून आली. त्यामुळे पथकाने मोटार थांबवून नागेश निकम याला ताब्यात घेतले.
त्याच्या मोटारीची तपासणी केल्यानंतर डिकीमध्ये पितळी हंडा आढळून आला. तसेच गिअर बॉक्ससमोर कपड्यात बांधलेले सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. चाैकशीत त्याने दोन दिवसापूर्वी मिरज तालुक्यातील एका गावात मूल होण्याचे औषध देण्याचा बहाणा करून दागिने चोरल्याची कबली दिली. त्याच्याकडून पाच लाखांची मोटार, दागिने असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, सतीश माने, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, अमर नरळे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, केरबा चव्हाण, विक्रम खोत, शशिकांत जाधव, विकास भोसले, अभिजीत पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
२० मिनिटात पसार
दागिने कपड्यावर ठेवल्यानंतर २० मिनिटे जागेवरून उठायचे नाही, तसेच कोणासोबत बोलायचे नाहीस असे सांगितले. त्यामुळे दाम्पत्य देवघरातील खोलीत बसून राहिले. २० मिनिटानंतर भामटा परत न आल्यामुळे त्यांना संशय आला.