Sangli: इस्लामपूरच्या काँग्रेसची जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीविरुद्ध दिल्लीत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:28 IST2025-07-04T19:27:01+5:302025-07-04T19:28:07+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाळवा तालुका काँग्रेस कमिटीची मालकी असणाऱ्या इमारतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेकायदेशीरपणे ताबा ठेवण्यात आल्याची ...

Sangli: इस्लामपूरच्या काँग्रेसची जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीविरुद्ध दिल्लीत तक्रार
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाळवा तालुका काँग्रेस कमिटीची मालकी असणाऱ्या इमारतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेकायदेशीरपणे ताबा ठेवण्यात आल्याची तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील व युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस विजय पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे.
नवी दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात जितेंद्र पाटील यांनी ही तक्रार लेखी स्वरूपात राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्याकडे केली आहे. या तक्रारीत गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवताना आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
जून १९५९ मध्ये शहराच्या सर्व्हे क्रमांक ४४५१ मधील ३५०.१५ वर्ग मीटर इतकी जागा वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या नावाने खरेदी केली आहे. नगरपरिषद प्रशासनाकडे काँग्रेस कमिटीच्या मालकीची नोंद आहे. मात्र गेल्या ४७ वर्षांपासून काँग्रेसच्या या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे. सध्या या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या नावाचा फलक लावून या संपूर्ण जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची तक्रार आता थेट काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील हायकमांडकडे करण्यात आली आहे.