Sangli Municipal Election 2026: सांगलीत फक्त हालचाली, खरी खेळी मुंबई–पुण्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:09 IST2025-12-26T18:08:11+5:302025-12-26T18:09:34+5:30
राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादांच्या भेटीला, भाजपची मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत चर्चा

Sangli Municipal Election 2026: सांगलीत फक्त हालचाली, खरी खेळी मुंबई–पुण्यात!
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला स्थानिक पातळीवर हालचाली करणाऱ्या भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची रणनीती आता थेट पुणे आणि मुंबईच्या बैठकीतून ठरवली जात आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात बैठक होत आहे. तर भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत आहेत.
शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही जागा वाटपाबाबत मुंबईत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे.
सांगली–मिरजेत इच्छुक उमेदवार, स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू असतानाच, अचानक वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवण्यात आली असून महायुतीच्या जागावाटप, युतीची गणिते आणि उमेदवार निवड यावर अंतिम निर्णय स्थानिक नव्हे, तर राज्यस्तरीय नेत्यांकडून होणार आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी नव्या-जुन्या वादात अडकली आहे. त्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलण्यात आला. गुरुवारी भाजपचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत होते. सायंकाळी त्यांची दहा ते पंधरा मिनिटासाठी भेट झाली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारी माहिती दिली. त्यानंतर पुन्हा रात्री सविस्तर बैठक होणार आहे.
वाचा : मिरजेत उमेदवारीवरून भाजपमध्ये रणकंदन, नाराजी; आवटी गटाने आधीच उमेदवार ठरवले
पुणे आणि मुंबईतील बैठकींमध्ये महापालिकेतील सत्ता समीकरणे, संभाव्य बंडखोरी, स्थानिक नाराजी आणि विरोधकांची ताकद याचा सखोल आढावा घेतला जात आहे. सांगली–मिरजेत दिसणारी हालचाल ही केवळ बाह्य तयारी असून, खरी रणनीती मुंबई–पुण्यात आखली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता वॉर्डपेक्षा अधिक मुंबई–पुणे बैठकीकडे लागले आहे.
भाजपमध्ये २० जागांचा तिढा
भाजपमधील २० जागांवर स्थानिक नेत्यांत एकमत न झाल्याने हा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यात पक्षात नव्याने आलेल्यांना दिलेला शब्द पाळण्याची कसरतही करावी लागत आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्याचा व महाआघाडीच्या गळ्याला उमेदवार लागू नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी भाजपची उमेदवार यादी ३० डिसेंबरलाच जाहीर होणार आहे. तत्पूर्वी काहीजणांना फोनवरून तयारीचा निरोप दिला जाणार असल्याचे समजते.
अजितदादांशी पुण्याला बोलवले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी चालविली आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. त्यात पवार गटात इनकमिंगही वाढत आहे. अशात पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीसह काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली आहेत. तो फाॅर्म्युला सांगलीत अंमलात आणण्याची रणनीती आखली जात आहे. या साऱ्या घडामोडीत गुरुवारी दुपारी उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पुण्याला बोलावून घेतले आहे. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी पुण्याला रवाना झाले आहेत. रात्री उशिरा अथवा शुक्रवारी सकाळी पवार यांच्यासोबत निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.
मदनभाऊ गटाची बैठक
भाजप नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटाची बैठक झाली. जयश्रीताई गटाला किमान १२ ते १३ जागा मिळण्याची आशा आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज भरून तयार ठेवण्याची सूचना केली आहे. त्यात माजी सहा नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यापैकी एकाला डावलले तर पुन्हा एकत्र बसून निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा बैठकीत झाल्याचे समजते.
शिंदेसेनेचेही पदाधिकारी मुंबईत
महायुतीतील शिंदेसेनेच्या जागांबाबत तिढाही अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्या उमेदवारीला आमदार सुरेश खांडे यांचा विरोध आहे. त्यामुळे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे पदाधिकारी मुंबईत ठाण मांडून आहेत. आता हा वाद मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेतून सुटणार असल्याचे सांगण्यात आले.