Sangli: मोक्का कारवाईतील फरारी संशयितास कोल्हापुरात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:12 IST2025-10-10T17:12:04+5:302025-10-10T17:12:33+5:30
पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई

Sangli: मोक्का कारवाईतील फरारी संशयितास कोल्हापुरात अटक
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील टोळी युद्धातून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर मोक्का कायद्याच्या कचाट्यात अडकूनही ९ महिन्यांपासून फरारी राहिलेल्या हल्लेखोरास पोलिस उपअधीक्षक अरूण पाटील यांच्या विशेष पथकाने कोल्हापुरातून अटक केली.
गुरुदत्त राजेंद्र सुतार (वय १९, रा. इस्लामपूर) असे या फरारी संशयिताचे नाव आहे. ज्ञानेश पवारच्या संघटित टोळीतील सुतार हा सदस्य होता. पवार याच्या टोळीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात गवंडी टोळीतील विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने-वडार याच्यावर एडका, परळी, चाकू आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात बाल्या वडार हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी त्याची आई सुरेखा रामचंद्र माने-वडार हिने पोलिसात फिर्याद दिली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी ज्ञानेश पवार या म्होरक्यासह इतर हल्लेखोरांना अटक केली होती. मात्र, गुरुदत्त सुतार हा तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. यादरम्यान पवार याच्या टोळीविरुद्ध विशेष पोलिस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) कारवाई केली होती. त्यामध्ये गुरुदत्त सुतार याचाही समावेश आहे.
दरम्यान, पोलिस उपअधीक्षक अरूण पाटील यांनी विशेष पथकाला सुतार याच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. पथकातील हवालदार दीपक ठोंबरे यांना गुरुदत्त सुतार हा कोल्हापूर येथील रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलिस निरीक्षक अल्पेश लावंड, उपनिरीक्षक सतीश मिसाळ, दीपक ठोंबरे, संदीप सावंत, प्रशांत देसाई, मंगेश गुरव यांच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून सुतार याला पळून जाण्याची संधी न देता बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास जेरबंद केले.