Sangli Politics: संजयकाका पाटील 'घड्याळा'ची साथ सोडणार?, पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:57 IST2025-01-09T17:57:23+5:302025-01-09T17:57:52+5:30
सदस्य नोंदणीसाठी बैठक घेतल्याने चर्चा; कार्यकर्ते संभ्रमात

Sangli Politics: संजयकाका पाटील 'घड्याळा'ची साथ सोडणार?, पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार
दत्ता पाटील
तासगाव : ऐन विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजयकाकांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा रंगली आहे. बुधवारी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी काका गटाची बैठक झाली. सदस्य नोंदणी जोमाने करण्याचे आवाहन केल्यामुळे संजयकाका घड्याळाची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अधिकृतपणे संजय काकांनी भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सलग दोनवेळा विजयी झालेल्या संजयकाकांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राजकीय भवितव्यासाठी संजयकाकांनी जिल्ह्याच्या राजकारणावरून पुन्हा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले.
महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे संजयकाकांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन पराभवामुळे काकागट ‘बॅकफुट’वर गेला. तर या पराभवानंतर दस्तूरखुद्द संजयकाकांसह त्यांचे पदाधिकारीदेखील सक्रिय नसल्याचे दिसत होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत संजय पाटील कोणती भूमिका घेणार? याची चर्चा होत होती. बुधवारी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. मतदारसंघात ६० हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाली पाहिजे, असेही आवाहन संजयकाकांनी केले. या आवाहनानंतर काका गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी सुरुवात केली आहे.
अधिकृतपणे संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी आवाहन केले. त्यामुळे संजयकाका पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर संजयकाका पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परततील अशीही चर्चा आहे. मात्र काका गटाचे कार्यकर्ते त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्यामुळे अद्याप संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे
कार्यकर्त्यांची गोंधळाची स्थिती
माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्याकडे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आहे. प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखालीच सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन संजयकाकांनी केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर मुलगा भाजपमध्ये असे चित्र निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांचा संभ्रम कायम राहिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणता झेंडा हातात घ्यायचा? या गोंधळात कार्यकर्ते दिसून येत आहे.